डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवलीतील गणेश श्रध्दा सोसायटीत सोमवारी रात्री ‘एक्सक्युज मी’ बोलण्यावरून झालेल्या वादाच्या वेळी एका महिलेच्या कडेवर नऊ महिन्याचे बाळ होते. महिलेच्या कडेवर बाळ असताना तिला मारहाण सुरू होताच, कडेवरील बालकाने हंबरडा फोडला. एका मुलाने हे बाळ महिलेकडून आपल्या ताब्यात घेतले. आईला लाकडी दांडक्याने होत असलेली मारहाण पाहून बालकाने परिसर हंबरड्याने दणाणून सोडला होता. बालकाच्या रडण्यामुळे इतर सोसायट्यांमधील रहिवासी बाहेर आले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
याप्रकरणात विष्णुनगर पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हे दाखल करून दोन्ही कुटुंबीयांना समज दिली आहे. परंतु, बेदम मारहाण झालेल्या महिलेने याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांच्या विरुध्द प्राथमिक तपासणी अहवाल दाखल पाहिजे असा आग्रह धरला आहे. सोमवारी रात्री एक महिला दुचाकीवरून येत होती. या महिलेच्या कडेवर नऊ महिन्याचे बाळ होते. एक महिला दुचाकी चालवित होती. या दोघी जुनी डोंबिवलीतील गणेश श्रध्दा सोसायटीत दुचाकीवरून प्रवेश करत असताना प्रवेशव्दारावर सोसायटीतील एका कुटुंबातील सदस्य उभा होता. दुचाकीवरील महिलेने प्रवेशव्दारावरील व्यक्तिला एक्सक्युज मी बोलत बाजुला होण्याची विनंती केली.
त्याचवेळी संबंधित व्यक्तिने पाठीमागे वळून विनंती करणाऱ्या महिलेला मराठीतून बोला, असे सुनावले. मराठीतून बोलणार नाही, असे महिलेने उलट उत्तर देताच रागाच्या भरात व्यक्तिने दुचाकीवरील महिलांबरोबर वाद घातला. हा वाद सुरू असताना वाद घालणाऱ्या व्यक्तिच्या घरातील कुटुंबीय बाहेर आले. त्यांनी दुचाकीवरील महिलांना मारहाण सुरू केली. यावेळी लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आला.
ही मारहाण सुरू असताना एका महिलेच्या कडेवर बालक होते. मारहाण पाहून बालकाने हंबरडा फोडला. मारहाणीच्या वेळी या मुलाला काही इजा होऊ नये म्हणून एका मुलाने या बालकाचा ताबा घेतला. हा मुलगाही दोन्ही महिलांच्या बचावासाठी इतरांना धावा करत होता. आईला मारहाण होत असल्याचे पाहून बालक अस्वस्थ होऊन रडत होते. मारहाणीच्या वेळी महिलेच्या केसाच्या झिंज्या उपटणे, लाकडी दांडक्याचे फटके महिलेला मारण्यात येत होते.
या मारहाण प्रकरणाची दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर विष्णुनगर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली. याप्रकरणी दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर विरोधी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत. मारहाण झालेल्या महिलेने याप्रकरणी आपला नव्याने जबाब घेऊन प्राथमिक तपासणी अहवाल दाखल करावा, अशी आग्रही मागणी पोलीस ठाण्यात केली आहे. तर हे एका सोसायटीतील प्रकरण आहे. दोन्ही कुटुंबीयांना समज देऊन त्यांना शांत राहण्याचे सूचित करण्यात आले आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
(जुनी डोंबिवलीत दोन कुटुंबीयांमध्ये एक्सक्युज मी बोलण्यावरून राडा.)