ठाणे जिल्ह्यात २० सप्टेंबर ते १० ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत सैन्य भरती होणार आहे. भारतीय सैन्य भरतीची प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक स्वरूपाची असते. त्यामुळे भरतीला येणाऱ्या तरुणांनी सावधगिरी बाळगून भरतीसाठी पैसे अथवा इतर वस्तूंची मागणी करणाऱ्यां दलालांविरुद्ध पोलीसांत तक्रार करावी. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल जाधव यांनी केले आहे.

हेही वाचा >>> ठाणे : गणेशोत्सवानिमित्ताने खरेदीसाठी नागरिकांची लगबग वाहतूकीवरही परिणाम

ठाणे जिल्ह्यात २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या दिवसांच्या कालावधीत सैन्य भरतीची प्रकिया राबविण्यात येणार आहे. यासाठी राज्यातून तसेच देशभरातून मोठया संख्येने तरुण उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारतीय सैन्यात रुजू होण्याचे स्वप्न अनेक तरुण उराशी बाळगून असतात. याचाच फायदा घेत सैन्यात भरती करून देण्याचे आमिष दाखवून अनेक भामट्यांकडून तरुणांची आर्थिक फसवणूक केली जाते. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत असतात. यावर खबदारी म्हणून भरतीला येणाऱ्या तरुणांनी अशा दलालांपासून सावध राहण्याचे जिल्हा सैनिक कार्यालयाने आवाहन केले आहे.

हेही वाचा >>> ठाकुर्ली खंबाळपाडा येथे पादचाऱ्याची रिक्षा चालकासह साथीदारांकडून लूट

सैन्य दलातील भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असते. यात कुठल्याही स्तरावर पैशांची देवाण घेवाण होत नाही. भारतीय सैन्यामध्ये भरती होण्यासाठी कुठल्याही दलालांची आवश्यकता नाही. दलाल किंवा कुठलीही मध्यस्थ व्यक्ती सैन्यामध्ये भरती करू शकत नाही. जर कुणी ही व्यक्ती किंवा दलाल सैन्यात भरती करण्यासाठी पैसे किंवा इतर वस्तूंची मागणी करत असेल तर तरुणांनी जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करावी. तसेच या विषयीची अधिक माहितीसाठी ०२२-२५३४३१७४ या क्रमांकावर संपर्क साधावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत ठाणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल जाधव यांनी परिपत्रक काढून माहिती दिली आहे.