ठाणे : गरजू, गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ‘विद्यादान सहाय्यक मंडळ’ ही संस्था गेली १६ वर्ष अविरतपणे काम करीत आहे. संस्थेच्या कामाअंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य मिळवून देण्यासह त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जातो. या संस्थेच्या मदतीने १६ विविध विद्याशाखांमध्ये ७००पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर ९१५ विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन आज स्वत:च्या पायावर उभे आहेत. पुढील पाच वर्षांमध्ये आणखी गरजवंत विद्यार्थ्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी मदतीचा हात देण्याचा संस्थेचा मानस असून त्यासाठी संस्थेला आर्थिक पाठबळाची गरज आहे.
शहरी तसेच ग्रामीण भागांमधील अनेक विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची प्रचंड इच्छाशक्ती आणि क्षमता असते, पण त्यांच्यासमोर घरच्या कठीण आर्थिक परिस्थितीची समस्या असते. पैशांअभावी योग्य मार्गदर्शनाचा अभाव या मुलांच्या प्रगतीच्या वाटेतील अडथळा असतो. अशा मुलांचा कल आणि पात्रता ओळखून त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी आर्थिक आणि मानसिक आधाराबरोबरच करिअरसंबंधी मार्गदर्शन करण्याचे काम ‘विद्यादान सहाय्यक मंडळ’ ही संस्था गेली अनेक वर्षे करत आहे. या संस्थेच्या संस्थापक गीता शहा आणि त्यांच्या सहकारी यासाठी झटत आहेत.
हेही वाचा : सर्वकार्येषु सर्वदा : हुशार, गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यादानाचा निरंतर यज्ञ
शहापूर तालुक्यात सुरू केलेल्या या कार्याला आता राज्यातील विविध भागातून प्रतिसाद मिळू लागला आहे. ठाणे शहरात या संस्थेचे मुख्य केंद्र आहे. तर, शहापूर, बोरिवली, पुणे , नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर याठिकाणी संस्थेच्या शाखा आहेत. शहापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परवडीसंबंधी २००४ साली लोकसत्ता वृत्तपत्रात बातमी प्रकाशित करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद म्हणून अनेकांनी केलेल्या अर्थसहाय्यातून १५ ऑगस्ट २००८ रोजी ‘विद्यादान सहाय्यक मंडळ’ या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेच्या माध्यमातून शास्त्र, वाणिज्य, वैद्याकीय, अभियंता, परिचारिका, उपयोजित कला शाखा अशा १६ विविध विद्याशाखांमध्ये सुमारे ७२५ विद्यार्थी शिक्षण घेत असून ९१५ विद्यार्थी उच्च शिक्षण घेवून आज स्वत:च्या पायावर उभे आहेत. या संस्थेने ठाणे आणि कळवा येथील सात वसतिगृहातून ७० मुलामुलींची राहण्यासह त्यांच्या जेवणाची सोय केली आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासह संस्था त्याचे पालकत्वही स्वीकारते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी इंग्रजी संभाषणाचे वर्ग, करिअर मार्गदर्शन, वाचनालय, सामाजिक शिबिरे, विविध कार्यशाळा, संभाषण चातुर्य, मुलाखतीची तयारी, वक्तृत्व स्पर्धा, ‘व्यक्त व्हा’ व्यासपीठ असे विविध उपक्रम राबविले जातात. सध्याच्या संगणक युगात शैक्षणिक कार्यासाठी विद्यार्थ्यांना ‘डिजिटल सशक्तीकरण’ उपक्रमाअंतर्गत संगणक, लॅपटॉप आणि स्मार्ट फोन दिले जातात.
याबरोबरच ‘विद्यादान’मध्ये मुलींना उच्च शिक्षणाची संधी देण्याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते. येत्या काळात सुमारे १५०० विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्याचा संस्थेचा मानस आहे. यामुळे आज उच्चशिक्षण घेऊन सुखकर आयुष्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला हातभार लागणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांना सर्व गोष्टींची उपलब्धतता करून देण्यासाठी संस्थेला आर्थिक पाठबळची नितांत गरज आहे.