शहराची ओळख काय, असे काही वर्षांपूर्वी विचारले असते तर कोणत्याही ठाणेकराने अभिमानाने ‘तलावांचे शहर’ हे उत्तर दिले असते. पण आता जसा काळ बदलला तशी ठाण्याची ओळखही बदलली. ‘तलावांचे शहर’ ही ओळख सांगणाऱ्या ठाण्याचा चेहरा अधिक तरुण झाला आणि हा तरुण चेहरा राममारुती रोड, गोखले रोड, तलावपाळीसारख्या झगमगीत रस्त्यावर अधिक दिसायला लागला आहे.
हल्लीच्या तरुणांचे वेळापत्रकामध्ये ‘निवांत’ असा विषयच नसतो. सगळे काही अगदी फास्ट. एकेकाळी तळ्यावर घिरटय़ा मारणारी किंवा तेथील कट्टय़ावर ठिय्या देऊन बसणारी तरुणाई आपसूकच ठाणे स्थानकाजवळील गुरुकृपा स्नॅक्स कॉर्नरकडे वळली. ठाणे स्थानकापासून पाचच मिनिटांच्या अंतरावरील हे कॉर्नर तरुणांच्या प्रसन्न ताटव्यांनी फुलू लागले. या तरुणांची भूक भागवण्यासाठी विनय नाईक यांनी गुरुकृपा स्नॅक्स कॉर्नर सुरू केले. आधी फक्त भेळपुरी, पाणीपुरी, शेवपुरी अशा नेहमीच्या चाट पदार्थाच्या साथीने सुरू झालेल्या कॉर्नरने गेल्या काही फास्टफूडमधील सर्व पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
ठाणे पश्चिम विभागात जगदीश बुक डेपोच्या अगदी समोरच तरुणांचा एखादा घोळका हातात चाट पदार्थानी किंवा सँडविचने भरलेल्या प्लेट घेऊन उभा दिसतो. येथे आता ज्यूस, सँडविचेस्, पिझ्झा असे वेगवेगळे तब्बल १५८ पदार्थ मिळतात. विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व पदार्थ १०० रुपयांच्या आतबाहेर आहेत. कारण येथे येणारे बहुतेक खवय्ये हे तरुण, महाविद्यालयामध्ये जाणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या खिशाला परवडेल असेच खाद्यपदार्थ येथे उपलब्ध आहेत.
येथे सगळेच पदार्थ खूपच उत्तम मिळतात. पण त्यातही खास सांगायचे झाले तर दहीपुरी आणि पाणीपुरी. प्रश्न पडला असेल ना ? दहीपुरी आणि पाणीपुरी यात खास काय असेल. येथील दहीपुरीमध्ये वापरले जाणारे दही हे नाईक यांच्या फार्महाऊसमधील गाईंच्या शुद्ध दुधापासून तयार केलेले असते. त्याच्याबरोबर इतर काही पदार्थामध्ये वापरली जाणारी चिंचही त्यांच्या शेतातील आहे. त्यामुळे येथील खाद्यपदार्थ ‘फास्ट फूड’च्या पंक्तीतील असूनही पौष्टिक आहेत.
येथे सँडविचेस्, पिझ्झा, तवा पुलाव, पाव भाजी, चाट, बर्गर, फॅ्रकीं, छोले-भटुरे यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. तसेच विविध ज्युसेस्ही येथे मिळतात. येथील पिझ्झावरच्या टॉपिंगप्रमाणे तुमच्या सँडविचमध्ये स्टफिंग केलेले असते. पावाच्या दोन लेअर्समध्ये हे स्टफिंग भरून मग टोस्ट केले जाते. त्यावर चिजची पखरण करून हे सँडविच तुमच्यासमोर येते. या सँडविचची चव लाजवाब आहे. त्यातही खासियत म्हणजे त्याच्याकडील हिरवी चटणी. या चटणीसह कोणतेही सँडविच लज्जतदार लागते. उत्तम दर्जा, चोख व्यवस्था, जिभेवर रेंगाळणारी चव यामुळे ‘गुरुकृपा’ तरुणांच्या पोटपुजेचा एक प्रमुख अड्डा बनला आहे.

स्वच्छता उल्लेखनीय
कमालीची स्वच्छता हा गुरुकृपाचे आणखी एक विशेष. त्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. कर्मचाऱ्यांना स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक ती सर्व साधने उपलब्ध करून दिली आहेत. येथील प्रत्येकजण कॅप आणि हॅन्ड ग्लोव्होज आणि अॅप्रन वापरतात.

गुरुकृपा स्नॅक्स कॉर्नर..
ठाणे रेल्वे स्थानकाजवळ
वेळ : दुपारी २ ते रात्री ११.३०

-शलाका सरफरे