शिवसेनेच्या दादा नगरसेवकांवरील भाजपचे प्रयत्न अपयशी

महापालिका निवडणुकांचे तिकीटवाटप जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेच्या मातब्बर नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न थोडक्यात हुकल्याची हुरहुर आता भाजपच्या स्थानिक नेत्यांना लागली आहे. कल्याण परिसरात भाजपची फारशी ताकद नाही. त्यामुळे या भागातून सातत्याने निवडून येणाऱ्या शिवसेनेच्या काही नगरसेवकांना गळाला लावायचे गणित भाजपच्या गोटात आखले गेले होते. राष्ट्रवादीच्या काही बडय़ा नगरसेवकांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नेण्यात आले होते. मात्र, या मातब्बरांना पक्षात आणण्याऐवजी कल्याण पूर्वचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांना पक्षप्रवेश देण्याचा निर्णय ऐनवेळी घेण्यात आला आणि गायकवाडांवर नाराज असलेले हे मातब्बर आल्या दारी परतले. यापैकी तब्बल पाच नगरसेवक पुन्हा निवडून आल्याने गणित कुठेतरी चुकल्याची हुरहुर भाजपचे स्थानिक नेते मंगळवारी व्यक्त करत होते.

कल्याण-डोंबिवली शहरात विकासकामांच्या आघाडीवर सपशेल अपयशी ठरूनही यंदाच्या निवडणुकीत शिवसेना बाजी मारणार असा अंदाज सुरुवातीपासूनच बांधला जात होता. विधानसभा निवडणुकीत कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांतून भाजपचे आमदार निवडून आले असले तरी या पक्षाच्या संघटनात्मक मर्यादा यापूर्वीच स्पष्ट झाल्या होत्या. कल्याण पूर्वेत भाजपची फारशी ताकद नसल्याने या परिसरातून पक्षाला मोठा धक्का बसेल, असे कयास बांधले जात होते. नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर आरूढ होत नरेंद्र पवार यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असली तरी त्यांच्या राजकीय मर्यादा यापूर्वीच स्पष्ट झाल्या होत्या. हे लक्षात घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीतील नाराजांना गळाला लावण्याची जणू स्पर्धाच शिवसेना-भाजपमध्ये लागली होती.

वेळीच सावध झाले अन् भाजपने कल्याण परिसरात पाय रोवण्यासाठी त्या भागातील नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले होते. हे करत असताना शिवसेनेतील काही मातब्बरांनाही जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. महापौर, स्थायी समिती सभापती अशी मोठी पदे भूषविलेले हे मातब्बर स्वतच्या प्रभागात मोठय़ा मताधिक्याने निवडून येत असतात. या नगरसेवकांना जाळ्यात ओढायचे आणि शिवसेनेला धक्का द्यायचा अशी रणनीती भाजपने आखली होती. मात्र, पालकमंत्री एकनाथ शिंदे वेळीच सावध झाल्याने यापैकी काहींना त्यांनी रोखले. तरीही काही नगरसेवकांवर बेकायदा बांधकामप्रकरणी अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून देण्याचे आमिषही या नगरसेवकांना दाखविण्यात आले होते. मात्र, ऐनवेळेस गणपत गायकवाड यांच्या प्रवेशाने भाजपचे हे गणित चुकल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

गायकवाड आले..मातब्बर गेले

कल्याण पूर्व परिसरातील शिवसेनेच्या या मातब्बर नगरसेवकांचे आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांसोबत हाडवैर आहे. गायकवाड भाजपच्या तंबूत दाखल होत आहेत हे लक्षात येताच शिवसेनेच्या ‘दादा’ नगरसेवकांनी भाजपचा प्रस्ताव फेटाळल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. राष्ट्रवादीचे काही नगरसेवक तर मुख्यमंत्र्यांच्या दालनातून माघारी फिरकले आणि पुढे शिवसेनेत गेले. यापैकी तब्बल पाच नगरसेवक पुन्हा निवडून आल्याने भाजपच्या गोटात हळहळ व्यक्त होत आहे. ‘ती’ खेळी चुकली नसती तर भाजप सत्तेच्या आणखी समीप पोहोचला असता अशी हळहळ मंगळवारी भाजपच्या डोंबिवलीतील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने बोलताना व्यक्त केली.