जीवनातील विविध आव्हानांना सामोरे जाताना कधी यश तर कधी अपयश पदरात पडते. आयुष्यात या दोन्ही गोष्टी अपरिहार्य असतात. स्वत:वर विश्वास असेल तर व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला समर्थपणे तोंड देऊ शकते. मात्र अनेकदा एकामागून एक आलेल्या संकटांच्या मालिकांनी मन सैरभर होऊन बुडत्याचा पाय खोलात अशी परिस्थिती होते. व्यक्ती आपला आत्मविश्वास गमावून बसते. मनाच्या आभाळात शंकाकुशंकांचे काळे ढग जमा होतात. गदिमांनी वर्णन केलेल्या बदकांच्या कळपातील कुरूप वेडय़ा पिल्लासारखी त्याची अवस्था होऊन जाते. आपण राजहंस आहोत याचा साक्षात्कार जोपर्यंत आपल्याला होत नाही, तोपर्यंत ही सैरभैर अवस्था कायम असते. ‘सेल्फी’ हा लघुपट आपल्याला हा आत्म साक्षात्कार घडवून आणतो..

आपण स्वत:ला इतरांपेक्षा जास्त ओळखतो आणि तीच ओळख महत्त्वाची हे आपल्या मनाला ठामपणे पटवून देण्याचे काम ‘सेल्फी’ हा लघुपट करतो. रामचंद्र गावकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सेल्फी’ या लघुपटात आपल्याला एक २७-२८ वर्षांचा असलेला काळा सावळा मुलगा दुपारच्या वेळी ट्रेनमधून प्रवास करताना दिसतो. त्याचे एकंदरीत कपडे पाहून तो एका सामान्य घरातील असल्याचे समजते. ट्रेनमधून उभ्याने प्रवास करताना त्याचा धक्का समोर उभ्या राहिलेल्या व्यक्तीला लागतो. तो माणूस या मुलाला शिव्या देत त्याचे पाकीट सांभाळू लागतो. ट्रेनमधून उतरल्यावर टी.सी. सगळ्यांना सोडून नेमके यालाच तिकीट विचारतो. स्टेशनच्या बाहेर आल्यावर हा मुलगा एका टॅक्सीला टेकून चहा पिण्यास सुरुवात करतो, तेवढय़ात एक मुलगी त्याला टॅक्सीचालक समजून ‘‘दादा, बांद्रा येणार का?’’ असे विचारते. टॅक्सीच्या आरशात नजर गेल्यावर तो स्वत:कडे पाहू लागतो. दिवसभरात घडलेल्या सगळ्या गोष्टी त्याला आठवू लागतात आणि या सगळ्या गोष्टी घडण्यामागचे कारण आपला कुरूप अवतार आहे, हे त्याला मनोमन पटते.

दुसऱ्या दिवशी ट्रेनमधून प्रवास करताना त्याला पुन्हा कालचाच ‘तो’ माणूस दिसतो. आदल्या दिवशी त्याने त्याला शिव्या घातलेल्या असतात. मात्र आज त्या माणसामागे एक चांगल्या घरतला अणि देखणा मुलगा उभा असतो. या देखण्या मुलाचा हात जर त्या माणसाच्या पाकिटाला लागला तर त्यावर त्या माणसाची काय प्रतिक्रिया असेल हे पाहण्याची इच्छा याच्या मनात येते. हा गुपचूप त्या माणसाच्या पाकिटाला हात लावतो अणि असं दाखवतो जसं त्या देखण्या मुलाचाच हात लागला आहे. ‘तो’ माणूस कालच्यासारखाच भडकतो. त्या देखण्या मुलासही शिव्या देऊ  लागतो. चांगल्या घरातला असूनही तो मुलगा काहीच उलट उत्तर देत नाही. उलट तो हसू लागतो. त्याच्या हसणाऱ्या चेहऱ्याकडे पाहून याला काही सुचेनासे होते व तो त्याला ‘‘काय झालं, का हसतो आहेस?’’ असं विचारतो. तेव्हा त्या मुलाने दिलेल्या उत्तराने याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. तो मुलगा नेमकं काय उत्तर देतो हे समजून घेण्यासाठी ‘सेल्फी’ हा लघुपट नक्की पाहा. युटय़ूबवर प्रदर्शित झाल्यानंतर हा लघुपट काही दिवसांमध्येच रसिकांच्या पसंतीला उतरला असून १३ लाखांहून अधिक लोकांनी हा  लघुपट पाहिला आहे. १७ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये याला पारितोषिके मिळाली आहेत.

‘अगाज’ म्हणजे सुरुवात. प्रत्येकजण आपले पहिले काम, आपली पहिली सुरुवात ही खूप मेहनत घेऊन आणि अगदी मनापासून करतो. सुरुवातीचे काम हे प्रत्येकसाठी खूप महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे येणारे प्रत्येक काम हे पहिल्याइतकेच अस्सल असावे या अर्थाने ठाणे मुंबईत राहणाऱ्या काही मित्रांनी ‘अगाज प्रोडक्शन्स’ या संस्थेला जन्म दिला. रामचंद्र गवणाकर जेव्हा महाविद्यालयात पदवी घेत होते, तेव्हा ‘सेल्फी’ची कथा त्याच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. त्या मुलाकडून मिळालेल्या उत्तराने रामचंद्रची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली होती. ज्या विचाराने आपण बदललो, तो विचार लघुपटाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत नेण्याचा निश्चय रामचंद्रने केला. कारण अनेकांना हा विचार प्रेरणादायी ठरेल, यावर त्याचा विश्वास होता.

रामचंद्रने हा संपूर्ण प्रसंग लिहून काढला व याला स्क्रिप्टचे स्वरूप दिले. त्याने ही स्क्रिप्ट त्याच्या मित्रांना ऐकवून दाखवली अणि स्क्रिप्टच्या पहिल्या वाचनातच आपण हा लघुपट करायचा असा मित्रांचा प्रतिसाद मिळाला. लेखन अणि दिग्दर्शन जरी रामचंद्रने केले असले तरी बाकी सगळ्यांनीही आपली जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडणे गरजेचे होते. अशा वेळी लघुपटाचा मुख्य कलाकार म्हणून प्रल्हाद कुडतरकर याची निवड झाली. प्रसाद नाईक याने छायाचित्रकाराची भूमिका पार पाडली. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी ही अभिषेक हरियण याने हाती घेतली व चित्रिकरणास सुरुवात झाली.

‘सेल्फी’चे बहुतेक शूटिंग हे ट्रेनमध्ये होते. त्यामुळे ट्रेनमधील गर्दीचे व्यवस्थापन करून चित्रीकरण करणे एक मोठे आव्हान होते. कारण चित्रीकरण सुरू असताना लोक कॅमेऱ्यात पाहायचे. त्यामुळे मनासारखे शॉटस् मिळेपर्यंत बराच वेळ जावा लागला. सुरुवातीचे चार टेक असेच घेतले जातील. त्यानंतर प्रवासी कंटाळतील. मग निवांतपणे नैसर्गिकरीत्या चित्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. कलावंतांनाही त्याची कल्पना देण्यात आली होती. अशा अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत ‘सेल्फी’चे चित्रीकरण पार पडले.

शूटिंग झाल्यानंतर मुख्य काम संगीत देण्याचे होते. ठाण्यात राहणाऱ्या अनुराग गोडबोले अणि श्रीकांत सोनावणे यांनी लघुपटाचे संपूर्ण संगीत केले. महेश वेंगुर्लेकर याने एडिटिंग अणि प्रणव गंधे याने लघुपटाच्या व्ही.एफ.एक्सची जबाबदारी पार पाडली. या सगळ्यांवर विश्वास ठेऊन बाळासाहेब म्हात्रे यांनी या लघुचित्रपटासाठी निर्माता म्हणून काम केले. सेल्फीला ‘मामि’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पेशल ज्युरी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. इतकेच नव्हे तर या लघुचित्रपटाला एकूण १७ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत. युटय़ूबवर टाकल्यानंतर पहिल्या महिन्याभरातच ‘सेल्फी’ व्हायरल झाली. आजच्या तारखेला ‘सेल्फी’ला युटय़ूबवर १३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. ‘झी टॉकीज’च्या लाइट हाऊस या कार्यक्रमातसुद्धा ‘सेल्फी’ प्रदर्शित करण्यात आली. सध्या आगाज प्रोडक्शन एका नव्या लघुचित्रपटाच्या कमाला लागले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सर्व टीम या नव्या प्रकल्पाच्या कामात गढून गेली आहे. लघुचित्रपटाचे नाव ‘नेम प्लेट’ असे असून पुढच्या वर्षांच्या सुरुवातीला प्रेक्षकांना हा लघुचित्रपट पाहायला मिळेल.