कल्याण – मध्य रेल्वेच्या वासिंंद आणि आटगाव रेल्वे स्थानकांदरम्यानच्या आसनगाव रेल्वे स्थानकात कसारा बाजुकडील फलाटावर पूर्व बाजुला उतरण्यासाठी पादचारी जिना किंवा स्कायवाॅक नाही. त्यामुळे अनेक प्रवासी दररोज रेल्वे मार्गात उड्या मारून, संंरक्षक भिंत ओलांडून, उभ्या असलेल्या मालगाडीखालून प्रवास करून जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत.
आसनगाव रेल्वे स्थानकात स्वतंत्र लोहमार्ग पोली ठाणे आहे. रेल्वे सुरक्षा बळ, लोहमार्ग पोलीस याठिकाणी तैनात असतात. त्यांना न जुमानता शेकडो प्रवासी दररोज मधला मार्ग म्हणून आसनगाव रेल्वे स्थानकात रेल्वे रूळावर उड्या मारून पूर्व दिशेकडील एस. टी., खासगी बस थांबा, रिक्षा वाहनतळाच्या दिशेने जातात. काही प्रवासी आसनगाव गावात, तर काही आटगाव दिशेकडील महाविद्यालय, शाळा, आदिवासी वस्त्यांमध्ये पायी जातात.
संरक्षक भिंत तोडली
आसनगाव रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजुला एक हजार मीटर अंतरावर सीएसएमटी दिशेने आणि कसारा दिशेने वळण आहे. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्या झटकन प्रवाशांच्या निदर्शनास येत नाहीत. सीएसएमटीहून आसनगाव रेल्वे स्थानकात आसनगाव किंंवा कसारा लोकल आली की कसारा बाजुकडील चार ते पाच डब्यांमधील बहुतांशी प्रवासी फलाटाच्या मध्यभागी असलेल्या पादचारी जिना किंवा सरकत्या जिन्याच्या दिशेने जात नाहीत. हे प्रवासी मधला मार्ग म्हणून रेल्वे मार्गात उड्या मारून आसनगाव पूर्व बाजूकडील तोडलेल्या संरक्षक भिंतीमधून, संरक्षक भिंतीवरून उड्या मारून जातात. विशेष म्हणजे भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते यामध्ये सर्वाधिक आघाडीवर असतात. दुधाच्या भरलेल्या किटल्या घेऊन जिने चढावे लागू नयेत, उतरावे लागू नये म्हणून हा मधला मार्ग पसंत करतात.
एकावेळी शेकडो प्रवासी रेल्वे मार्गात उतरून रिक्षा वाहनतळ, बस थांब्यावर जाण्याचा प्रयत्न करतात. यावेळी रेल्वे स्थानकात बाजुला काढलेली मालगाडी उभी असेल तर प्रवासी जीवाची पर्वा न करता या मालगाडी खालून, दोन डब्यांच्या मधल्या मोकळ्या जागेतून उडया मारून जातात. हा मधल्या मार्गाने प्रवास करताना अचानक मेल, एक्सप्रेस, लोकल आली तर या प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे.
रेल्वे अधिकारी हैराण
आसनगाव रेल्वे स्थानकात उतल्यानंतर अनेक प्रवासी रेल्वे मार्गातून प्रवास करतात म्हणून पाच वर्षापूर्वी रेल्वेने रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात रेल्वे रूळाजवळ आठ फूट उंचीची, एक हजार मीटर लांबीची संरक्षक भिंत रेल्वेने उभारली. यामुळे सुरूवातीला प्रवाशांनी रेल्वे मार्गातून जाणे पसंत केले होते. काही प्रवाशांनी संरक्षक भिंतीच्या उंचीवरील दगडी हळूहळू काढून टाकल्या. त्यानंतर संरक्षक भिंतीला मध्येच भगदाड पाडून मधल्या मार्गाने जाता येईल अशी व्यवस्था केली आहे. रेल्वे मार्गातून प्रवाशांनी जाऊ नये म्हणून सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही प्रवासी ऐकत नसल्याने रेल्वे अधिकारी हैराण आहेत.

