आमदार आशीष शेलारांचे प्रत्युत्तर

शिवसेनेने आधी काळ्या पैशांबाबत ठाम भूमिका घ्यावी. तसेच शिवसेना काळ्या पैशांच्या बाजूने असेल तर जनताच त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देईल आणि काळ्या पैशांविरोधात असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे प्रतिउत्तर भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी गुरुवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिले. तसेच आमचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने गैरसमज करू नये आणि गैरसमज पसरवू नये, असा सल्लाही दला.

ठाणे येथील भाजपच्या शहर कार्यालयात गुरुवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये राज्य सरकारने दोन वर्षांच्या काळात केलेल्या विकासकामांची तसेच योजनांची माहिती आमदार शेलार यांनी दिली. तसेच नोटाबंदीच्या मुद्दय़ावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणाऱ्या शिवसेनेचाही त्यांनी समाचार घेतला. शिवसेनेने दुतोंडी भूमिका घेऊ नये. राज्यातील काही घराण्यांची तशी परंपरा आहे. मात्र, शिवसेनेने तशी भूमिका घेऊ नये असेही शेलार म्हणाले. शिवसेनेला कधी मनमोहन सिंग यांचे कौतुक करावे वाटते. तर कधी पवार हे पंतप्रधान व्हावे असे वाटते आणि कधी ममता यांच्यात त्यांना कालीमातेचे दर्शन होते. त्यामुळे  शिवसेना गोंधळलेल्या अवस्थेत असून त्यांनी  एकच टोकदार भूमिका घ्यावी.

‘क्लस्टर’साठी पाठपुरावा..

क्लस्टर योजनेसंबंधी उच्च न्यायालयामध्ये राज्य शासनाकडून बाजू मांडली जाईल. तसेच ही योजना लवकर कशी मार्गी लागेल, यासाठी राज्य शासनाकडून पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.