ठाणे : ठाणे महापालिका निवडणूकीत माजी महापौर अशोक वैती यांचा ठाकरे गटाचे उमेदवार शहाजी खुस्पे यांनी पराभव केला. अशोक वैती यांच्या पराभवामुळे शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. परंतू, आता समाजमाध्यमावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात असे लिहिले आहे की, ‘अशोक वैती हरला नाही… मतपेटीत आकडे बदलले’ असा संदेश या पोस्ट मध्ये आहे.

शिवसेनेकडून अशोक वैती हे मागील अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक १३ मधून निवडून येत होते. हा भाग ज्ञानेश्वर नगर, रामचंद्र नगर, काजूवाडी, हाजूरी असा आहे. अशोक वैती हे माजी महापौर देखील होते. ठाणे महापालिका निवडणूकीत यंदा त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाकडून नवखे उमेदवार शहाजी खुस्पे हे निवडणूक लढवित होते. परंतु अशोक वैती यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला आहे.

खुस्पे यांना १२ हजार ८६० मते मिळाली. तर अशोक वैती यांना १२ हजार १९३ मते मिळाली. काजुवाडी भागात अशोक वैती हे राहतात. याच प्रभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील निवासस्थान आहे. खुस्पे यांनी प्रचारामध्ये देखील वैती यांच्यापेक्षा आघाडी घेतली होती. त्यामुळे हा विजय झाल्याचे बोलले जाते. ठाण्यात ठाकरे यांचे एकमेव उमेदवार आहेत. वैती यांच्या पराभवामुळे शिंदेंना मोठा धक्का बसला. परंतू, आता ‘अशोक वैती हारला नाही… मतपेटीत आकडे बदलले’ असा संदेश प्रसारित केला जात आहे.

पोस्ट काय आहे…

अशोक वैती हरला नाही… मतपेटीत आकडे बदलले, पण माणूस कमी पडला नाही. लोकांसाठी जळणारी तळमळ, महानगरपालिकेतला अभ्यासू आवाज, पक्षापेक्षा माणसाला महत्त्व देणारा विचार आज निकालात मावू शकला नाही. हा पराभव एका नगरसेवकांचा नाही, हा पराभव कामावर विश्वास ठेवणार्‍या लोकशाहीचा आहे. कारण जो नेता लोकांसाठी उभा राहतो, तो हरत नसतो तो इतिहासात नोंदला जातो.