प्रचाराच्या तयारीत असलेले इच्छुक उमेदवार संभ्रमात

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका प्रशासनाने कच्ची प्रारूप प्रभाग रचना करण्याच्या कामाला सुरुवात केली होती.

नव्या प्रभाग रचनेच्या अंदाजाच्या चर्चेमुळे पेच

ठाणे : पंचवार्षिक मुदत संपत आल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेने सुरुवातीला एक सदस्य प्रभाग पद्धतीने आणि त्यानंतर तीन सदस्य प्रभाग पद्धतीने कच्ची प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू केले होते. परंतु नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे महापालिकेला पुन्हा तिसऱ्यांदा नव्याने कच्ची प्रारूप प्रभाग रचना तयार करावी लागणार आहे. या रचनेनुसार महापालिका क्षेत्रात नगरसेवकांची संख्या ११ ने वाढून ती १४२ होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अद्याप पत्र प्राप्त झालेले नसल्यामुळे पालिकेने अद्याप प्रभाग रचनेचे काम सुरू केले नाही. त्यातच प्रभाग रचना कशी असेल याविषयीच्या अंदाजाच्या वेगवेगळ्या चर्चा शहरात चर्चिल्या जात असून यामुळेच दिवाळीचा मुहूर्त साधून प्रचाराचा श्रीगणेशा करण्याच्या तयारीत असलेले इच्छुक संभ्रमात पडले आहेत. 

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका प्रशासनाने कच्ची प्रारूप प्रभाग रचना करण्याच्या कामाला सुरुवात केली होती. हे काम सुरू असतानाच राज्य शासनाने नगरसेवक संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून यानुसार ठाणे महापालिकेतील नगरसेवकांची संख्या १४२ होणार आहे. नगरसेवक संख्येत ११ ने वाढ होणार असल्याने पालिकेला तिसऱ्यांदा नव्याने कच्ची प्रारूप प्रभाग रचना तयार करावी लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अद्याप पत्र प्राप्त झालेले नसून हे पत्र प्राप्त होताच नव्याने कच्ची प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ठाणे महापालिका क्षेत्रात २००३ मध्ये तीन सदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली होती. या निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा आणि सद्य:स्थितीतील प्रभाग रचनेचा अंदाज बांधत इच्छुक नगरसेवकांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू केले आहे. त्यात येत्या काही महिन्यांत निवडणूक होणार आहे. त्यामुळे दिवाळीचा मुहूर्त साधून प्रचाराचा श्रीगणेशा करण्याच्या तयारी काही इच्छुकांनी सुरू केली होती. त्याचाच एक भाग म्हणून मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिवाळी भेटवस्तू तसेच उटणे असे साहित्य देण्याची तयारी सुरू केली आहे. आता नगरसेवक संख्या वाढणार असल्याने प्रभाग कसे होणार आणि कोणत्या भागात नगरसेवक वाढणार याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चेमुळे इच्छुक संभ्रमात पडले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aspiring candidates preparing for the campaign in confusion akp