डोंबिवली – डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्यावर असलेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोरा (४९) यांना गेल्या आठवड्यात जुनी डोंबिवलीतील शिव मंदिर भागात पाच जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. मोटार कार चालकाने धारदार हत्याराने वार केल्याने पोलीस अधिकारी बोरा यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या पाच जणांच्या विरूध्द पोलीस अधिकारी बोरा यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन बुलेट स्वारवरील चार जण आणि एक क्रेटा मोटारीचा चालक असा गुन्हा दाखल इसमांमध्ये समावेश आहे. क्रेट कारचा वाहन क्रमांक एमएच -०५-ईजे-५९६५ आहे.
पोलीस अधिकारी बोरा यांनी पोलीस ठाण्यात तक्रारीत दिलेली माहिती, अशी की गेल्या आठवड्यात आपले दिवसभरातील पोलीस ठाण्यातील कर्तव्य उरकून आपण रात्री पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान दुचाकीवरून जुनी डोंबिवली खंडोबा मंदिर भागातील आपल्या घरी चाललो होतो. जुनी डोंबिवलीतील शिव मंदिराजवळील वळणावर समोरून एक दुचाकी स्वार वळण घेत होता. त्याने वळण घेण्याचे सिग्नल दुचाकीला दिले नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. म्हणून आपण त्या दुचाकी स्वाराला वळण घेताना सिग्नल देत जाणे असे सांगत होतो. या प्रकाराने आमची दोघांची वाहने रस्त्यावर थांबली होती.
याचवेळी आमच्या पाठीमागून एक मोटार कार चालक येत होता. आमची वाहने रस्त्यावर थांबली होती. त्यामुळे तो वाहन चालक पाठीमागून मोठ्याने भोंगा वाजत होता. आपण आपली दुचाकी बाजुला घेऊन पुढे निघालो. त्याचवेळी मोटार कार चालक पुढे जाऊन थांबला. पोलीस अधिकारी बोरा यांनी त्या मोटारीजवळ जाऊन त्यामधील चालकाला त्या दुचाकी स्वाराने काय चुकी केली होती. आपण पोलीस अधिकारी असल्याचे त्याला सांगितले असल्याचे कार चालकाला सांगितले.
त्यावेळी कार चालकाने ‘तु पोलीस असला म्हणून काय झाले असे प्रश्न करून तु येथून निघून जा नाहीतर तुला फोडून काढीन’ अशी धमकी दिली. हा प्रकार सुरू असतानाच तेथे बुलटेवरून, दुचाकीवरून एकूण चार जण आले. ते मोटार कार चालकाला भावा काय झाले आहे असे म्हणून आपणास शिवीगाळ करत मारहाण करू लागले. पाचही जण एकावेळी आपणास मारहाण करू लागले. आपण एकटे असल्याने त्यांनी आपणास चारही बाजुने घेरले होते.
आपण बचावाच्या पवित्र्यात येत असताना मोटार कार चालकाने जवळील धारदार हत्याराने आपल्या कानावर वार केले. त्यामुळे गंभीर दुखापत होऊन आपल्या कानातून रक्तस्त्राव सुरू झाला. रक्तस्त्राव सुरू झाला असताना आपणास टोळके ठोशाबुक्क्याने मारहाण करत होते. आपण घडल्या प्रकाराचे मोबाईलमधून चित्रीकरण करत होतो. बुलेटवरील एका इसमाने आपल्या हातामधील मोबाईल जमिनीवर पाडून त्यामधील चित्रीकरण नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर टोळके तेथून निघून गेले, असे तक्रारीत म्हटले आहे.
