डोंबिवली रेल्वे स्थानकात तुफान गर्दीच्या वेळेत फलाट क्रमांक पाचवर मुंबईकडे जाणाऱ्या एका अतिजलद लोकलमध्ये चढताना सोमवारी एक महिला प्रवासी लोकल दरवाजाचा लोखंडी आधारदांड्यावरील हात सटकल्याने आणि पाय घसरल्याने फलाट आणि रेल्वे रूळाच्या मध्य भागात जाऊन पडली. तात्काळ प्रवाशांनी ओरडा केला, मोटरमनला लोकल थांबवून ठेवण्याची विनंती केली. ओरडा पाहून रेल्वे कर्मचारी, सुरक्षा जवान, लोहमार्ग पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी प्रवाशांच्या मदतीने सुरक्षितपणे महिलेला बाहेर काढले.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर १५ ते २० मिनीटे या घटनेने गलका उडाला होता. सोमवार कामावर जाण्याचा पहिला दिवस. त्यामुळे फलाटावर नेहमीप्रमाणे तुफान गर्दी होती. प्रत्येकाची गर्दीला न जुमानता वेळेत कार्यालयात पोहचण्याची धडपड होती. कल्याणहून सीएसएमटीकडे निघालेली सकाळी ८.५० वाजताची १५ डब्यांची अति जलद लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात आली. या लोकलमध्ये गर्दीतून चढताना मानसी किर (२४) यांचा लोकल दरवाजाच्या मधील आधारदांडा हातामधून सटकला आणि त्या पाय घसरल्याने फलाटावरून मधल्या पोकळीतून थेट रुळाच्या दिशेने पडल्या.
हे ही वाचा… वाऱ्याने उडून जाण्याच्या भीतीने पर्यटकांची कोकणाकडे पाठ, जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
फलाट-पायदान आणि रेल्वे रूळ या पोकळीत महिला अडकल्याचा ओरडा प्रवाशांनी केल्यानंतर ही माहिती रेल्वे सुरक्षा जवान, मोटरमनला देण्यात आली. लोकल काही वेळ थांबवून ठेवण्यात आली.महिलेला अडकल्याचे पाहून महिला प्रवासी घाबरल्या आणि तिच्या बचावासाठी पुढे सरसावल्या. महिला अडकलेल्या डब्यातील महिला प्रवासी तातडीने डब्यातील भार कमी करण्यासाठी फलाटावर उतरविण्यात आल्या. भार कमी झाल्यानंतर डोंबिवली रेल्वे स्थानकाचे उप स्थानक अधिकारी अनिमेश कुमार, रेल्वे सुरक्षा बळाचे भावना सिंग, लोहमार्ग हवालदार गाईखे, पाॅईन्टसमन मिथून गायकवाड, प्रभाकर ठाकरे आणि प्रवासी कार्तिक सिंग आणि इतर प्रवाशांनी कौशल्याने त्या महिलेला कोणतीही इजा होणार नाही अशा पध्दतीने फलाट आणि रूळाच्या मार्गिकेतून बाहेर काढले. या महिलेला थोडे खरचटले होते. महिला पोकळीतून बाहेर काढल्यावर मग लोकल सीएसएमटीकडे रवाना झाली. तोपर्यंत कल्याण ते ठाकुर्लीच्या दिशेने अतिजलद लोकल रांगेत उभ्या होत्या. रखडलेली लोकल सुटल्यावर मग पाठोपाठ जलद लोकल स्थानकात दाखल झाल्या.
हे ही वाचा… अंबरनाथ गोळीबारातील दोन जण डोंबिवलीतील घारिवलीत अटक
त्या महिला प्रवाशाला उपस्थितांनी धीर दिला. तिच्या कुटुंबीयांना ही माहिती देण्यात आली. महिला सुस्थितीत असल्याची खात्री पटल्यावर तिला रेल्वे सुरक्षा जवानांनी तिच्या घरी पोहचविण्याची व्यवस्था केली. तिला रुग्णालयात नेण्याची व्यवस्था रेल्वे जवानांनी केली होती. परंतु, तिने आपण सुस्थितीत असल्याचे सांगितले.
हे ही वाचा… Maharashtra News Live : मराठवाड्यात पावसाचा कहर, तीन जणांचा मृत्यू, ८० जनावरे वाहून गेली, १३५ घरांची पडझड
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांकावरून जाणाऱ्या लोकल का रखडल्या आहेत, याची माहिती काही वेळ प्रवाशांना न समजल्याने प्रवाशांनी कुरबूर सुरू केली होती. नंतर एक महिला रेल्वे मार्गात पडल्याने लोकल उशीरा धावत असल्याचे नंतर जाहीर झाले. प्रवाशांच्या तत्परतेमुळे आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेळीच हालचाली केल्याने एक मोठा अनर्थ टळला.