ठाणे : ठाण्यातील वाढती प्रवासी संख्या पाहता ठाण्यातही मुंबई महापालिका धर्तीवर ‘टीएमटी डबल डेकर बस सेवा’ सुरू करण्यात यावी अशी मागणी लेखी स्वरुपात धर्मवीर फेम बालकलाकार अर्थव वगळ यांने तत्कालीन ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली होती. अखेर अर्थव वगळ याच्या मागणीला यश मिळाले असून ठाण्यात लवकरच धावणार टीएमटी डबल डेकर बस दाखल होणार आहेत.
धर्मवीर चित्रपटात बालकलाकार अर्थव वगळ याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बालपणाची मुख्य भूमिका साकारली होती. त्याच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. सर्वात पहिले त्याने वर्ष २०२३ रोजी तत्कालीन ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन ठाण्यातील वाढती प्रवाश्यांची संख्या पाहता ठाण्यातही मुंबई महापालिका धर्तीवर ‘टीएमटी डबल डेकर बस सेवा’ सुरू करण्यात यावी तसेच ठाणेकर प्रवाश्याच्या सोयीसाठी ऑनलाईन पद्धतीने टीएमटी बस तिकीट उपलब्ध करून द्यावे अशी लेखी मागणी केली होती. त्यानुसार, तत्कालीन आयुक्त बांगर यांनी अर्थवच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. ती मागणी आता पूर्ण होत आहे. दिवाळीपर्यंत १०० एसी इलेक्ट्रिक, १०० सीएनजी आणि १० डबलडेकर बस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. यातील पहिली डबलडेकर बस आनंदनगर बस डेपो मध्ये दाखल झाली आहे. आवश्यक नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. अथर्व हा अभिनेता व त्याच्या सामाजिक क्षेत्रातील विविध कार्यासाठी व उपक्रमासाठी ओळखला जात असून तो के.जी. सोमय्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
ठाणे महानगरपालिका ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर टीएमटी सेवा चालवते. नागरिकांना परवडणारा आणि सोयीस्कर सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय मिळावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सध्या टीएमटीच्या ताफ्यात ४०७ बस असून त्यापैकी सुमारे ३८० बस प्रत्यक्ष धावतात. मात्र, शहराची लोकसंख्या २७ लाखांवर गेल्याने उपलब्ध बस गाड्यांची संख्या अपुरी ठरत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना रिक्षा किंवा खासगी वाहनांचा वापर करावा लागतो. ही गरज ओळखून मागील काही वर्षांत बससंख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.
पीएम ई-बस योजनेअंतर्गत टीएमटीला १०० एसी इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या आहेत. त्याशिवाय जीसीसी पद्धतीने १०० सीएनजी बस घेतल्या जाणार आहेत. या सर्व बस दिवाळीपर्यंत हळूहळू ताफ्यात सामील होतील. यासोबतच १० डबलडेकर बसही खरेदी केल्या जात असून त्यातील पहिली बस लवकरच दाखल होईल. ही बस कोणत्या मार्गावर चालेल हे अद्याप निश्चित नसले तरी घोडबंदर ते ठाणे मार्गावर ती धावण्याची शक्यता आहे.
सध्या असलेल्या ४०७ बसांची संख्या वाढून भविष्यात ७७७ पर्यंत पोहोचणार आहे. पुण्यातील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (CIRT) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे ५० बस असणे अपेक्षित आहे. त्या प्रमाणात ठाण्यास सुमारे १३५० बसांची गरज आहे. नवीन ३७० बस येत असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार आहे. परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दिवाळीपर्यंत सर्व नवीन बस टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होतील, ज्यामुळे ठाणेकरांना अधिक सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
