लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : येथील ज्येष्ठ मल्लखांबपटू आणि युरोपात मल्लखांब व्यायाम प्रकाराची ओळख करून देणारे पुरूषोत्तम उर्फ बजरंग सावंत यांचे बुधवारी येथे हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, विवाहित मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
कल्याण मधील नमस्कार मंडळाचे पुरूषोत्तम सावंत माजी अध्यक्ष होते. अध्यक्ष असताना मंडळाच्या माध्यमातून पॉवर लिफ्टिंग, वेट लिफ्टिंग, शरीरसौष्ठव, सूर्यनमस्कार हे प्रकार जनमानसात रूजविण्यात त्यांनी विशेष प्रयत्न केले. या स्पर्धांचे आयोजन करण्यात ते नेहमी पुढाकार घेत होते.
उमेदीच्या काळात ते मल्लखांबचे प्रशिक्षण देण्यासाठी जर्मनीला गेले होते. अशाप्रकारे विदेशात शिक्षण देण्यासाठी जाणारे ते कल्याण मधील पहिले क्रीडापटू होते. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ भागात त्यांनी अनेक शिष्य घडविले. त्यांच्या निधनाबद्दल क्रीडाप्रेमींना दुख व्यक्त केले आहे.
