कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, नवी मुंबईतील खारघर हद्दीमध्ये बँकांची एटीएम फोडून फरार झालेल्या नऊ जणांच्या टोळीतील दोन कुख्यात गुन्हेगारांना पकडण्यात कोळसेवाडी, महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या शोध पथकांना यश आले. फरार सात जणांचा शोध घेतला जात आहे. दोन जणांकडून मोटार कार, लुटीची रक्कम असा एकूण २० लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

सरफुद्दीन रईस खान, उमेशकुमार प्रजापती (२५, गाळा क्र. तीन बाबू मार्केट, लोयलका रस्ता, साकीनाका, मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. उमेशकुमार मुळचा उत्तरप्रदेशातील सेखुई रिठीया बाजार येथील रहिवासी आहे. या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सादीक सिंग, बबलु खान आणि इतर तीन जण, हमीद अशरफ, जहिद खान आणि एक इसम यांचा शोध सुरू केला आहे. एटीएममध्ये चोरी कशी करावी याची माहिती देण्यासाठी काही तंत्रज्ञ कुशल चोर हरियाणामधून कल्याणमध्ये आले होते.

कल्याण पूर्वेत कोळसेवाडीमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरट्यांनी २७ लाख ६७ हजाराची रक्कम लुटून नेली होती. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बशीर शेख, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सात तपास पथके या एटीएम चोरीतील आरोपी पकडण्यासाठी स्थापन केली होती.

एटीएम परिसरातील चित्रिकरण तपासून तांत्रिक माहितीव्दारे पोलिसांनी सरफुद्दीन खान याला पहिले अटक केली. त्याने दिलेल्या माहितीमधून उमेशकुमार प्रजापतीचे नाव पुढे आले. या दोघांना अटक केल्यानंतर इतर सात जणांची नावे पुढे आली आहेत. खान, प्रजापतीने कोळसेवाडीसह नवी मुंबईतील खारघर येथील एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने कापून रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली. चोरीसाठी ते दोन मोटार कारचा वापर करत होते. चोरीतील ७० हजार रुपये खानने बँक खात्यात जमा केले होते. आरोपींना वापरलेले मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. या आंतराज्य टोळीने आतापर्यंत उत्तरप्रदेश, हरयाणा, महाराष्ट्रात किती चोऱ्या, एटीएम फोडले आहेत. याचा तपास पोलीस करत आहेत.