पक्ष्यांच्या अधिवासावर आक्रमण

सिमेंट-काँक्रीटचे जंगल, बेसुमार वृक्षतोड, प्रदूषण, शिकार यांमुळे वसईतील पक्षी लुप्त होऊ लागले आहेत.

सनसिटी येथील पाणथळ जागेवर पंपाच्या सहाय्याने पाणीउपसा करण्यात येत होता. 

सनसिटी येथे पाणथळ जागेवर पाणीउपसा; कारवाई करण्याची मागणी

सनसिटी येथील पाणथळ जागेवर पाणीउपसा केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. या ठिकाणी एक व्यक्ती पंपाद्वारे पाणीउपसा करत असल्याचे दिसून आल्यानंतर त्याला पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला. कारवाई करण्यापूर्वीच ही व्यक्ती पळून गेल्याचे तहसीलदारांनी सांगितले. मात्र पक्ष्यांचे अधिवास असलेल्या या ठिकाणाहून पाणीउपसा करणे कायद्याने गुन्हा असून असे करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

सिमेंट-काँक्रीटचे जंगल, बेसुमार वृक्षतोड, प्रदूषण, शिकार यांमुळे वसईतील पक्षी लुप्त होऊ लागले आहेत. मात्र वसई परिसरात अजूनही काही पाणथळ जागा, समुद्रकिनारे, मिठागरे अस्तित्वात असून या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर पक्ष्यांची संख्या पाहायला मिळते. वसईतील सनसिटी परिसरातील पाणथळ जागा म्हणजे पक्षी अभ्यासकांसाठी आकर्षणाचे केंद्र. इंडियन कक्कू, पावशा, सर्प गरुड, महाभृंगराज, श्यामा, जंगली पिंगळा, सुभग, हळद्या, सूर्यपक्षी, स्वर्गीय नर्तक, फुलटोचा या पक्ष्यांसह श्रीलंकेतून स्थलांतर करणारा तिबोटी खंडय़ा पक्षी यांचे दर्शन येथे होत असते. फ्लेमिंगो पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी येथे पक्षीप्रेमींची गर्दी होत असते. त्यामुळे हा परिसर जर नष्ट झाला तर तो पक्ष्यांच्या वस्तिस्थानावर घाला असेल, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

या पाणथळ ठिकाणी एक व्यक्ती पाणीउपसा करत असल्याचे जनआंदोलन समितीच्या डॉमनिका डाबरे यांनी पाहिले. त्यांनी त्याला हटकले असता या व्यक्तीने दाद दिली नाही. याबाबत डाबरे यांनी वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे तक्रार केली. सुरवसे यांनी तात्काळ तलाठय़ांना आदेश देऊन येथील पाणीउपसा बंद करण्याचे आदेश दिले. मात्र त्याआधीच पाणीउपसा करणारी व्यक्ती पळून गेली. ही व्यक्ती कोणत्या कामासाठी येथून पाणीउपसा करत होती याबाबत तपास सुरू असल्याचे किरण सुरवसे यांनी सांगितले.

सनसिटी येथे दरवर्षी अनेक पक्षी येतात. पावसाळा संपल्यानंतरही येथे काही दिवस येथे पाणी राहते. तोपर्यंत पक्षीही येथे असतात. पाणी आटले की ते स्थलांतर करतात. मात्र येथून पाणीउपसा केला तर पक्ष्यांचे वस्तिस्थान नष्ट होणार आहे. त्यामुळे  पाणीउपसा करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा.

डॉमनिका डाबरे, जनआंदोलन समिती

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Attack on bird habitats suncity vasai