ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून मराठी विरुद्ध अमराठी वाद मुंबई आणि ठाण्यात उफाळून येत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मोबाईलला रिचार्ज करण्याच्या वादातून मराठी माणसावर हल्ला झाला होता. हा हल्ला इतका भीषण होता की, तो तरुण रक्तबंबाळ झाला होता. त्याचे चित्रीकरण समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर आता ठाणे पोलिसांनीही त्या परप्रांतियांवर कारवाई केली आहे. ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांच्या कार्यालयातदेखील या परप्रांतियांना बोलावून त्यांना दणका देण्यात आला होता.
ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरात राहणारा मराठी तरुण घाटकोपर येथे कामाला आहे. सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास लोकमान्यनगरला आपल्या घरी जात होता. त्यावेळी मोबाईलमधील रिचार्ज संपला. यामुळे तो ठाणे स्थानकाजवळील मोबाईल दुकानात गेला. दुकानात त्याला बराच वेळ ताटकळत उभे रहावे लागले आणि काही वेळाने रिचार्ज नाही असे उत्तर दुकानदाराने त्याला दिले. त्यावरून त्याचा दुकांदाराशी वाद झाला आणि त्यानंतर दुकानातील तीन ते चार परप्रांतीय कामगारांनी त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला.
या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली होती. मारहाणीत जखमी झालेला मराठी तरुण हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचा कार्यकर्ता आहे. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी मारहाण करणाऱ्या त्या परप्रांतीय कामगारांना कार्यालयात आणून जाब विचारला. तिथे मारहाण झालेल्या मराठी तरुणही उपस्थित होता. त्याने मारहाण करणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या कानशिलात लगावली. यानंतर कामगारांनी तरुणांच्या पाया पडत माफी मागितली. तसेच कांन पकडून अशी चूक पुन्हा करणार नसल्याचे सांगितले.
याप्रकरणात त्या मारहाण करणाऱ्या परप्रांतियांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण झालेल्या तरुणाने तक्रार दाखल केल्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५ (२), ११८ (१) आणि ३ (५) या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.