ठाणे स्थानक परिसरात सदैव कोंडी

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाचालकांच्या बेशिस्तीमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. सॅटिसखाली असलेल्या रिक्षाथांब्यावर शिस्तबद्धपणे प्रवासीसुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी उपाययोजना करूनदेखील रिक्षाचालकांची मनमानी कमी झालेली नाही.

सॅटिसखालील रिक्षा-टॅक्सीसाठीच्या मार्गिकांप्रमाणेच खासगी वाहनांसाठीच्या मार्गिकेतही रिक्षा उभ्या करण्यात येत असल्याने येथून जाणारी वाहतूक विस्कळीत होत आहे. याचा परिणाम स्थानक परिसरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर होत असला तरी, रिक्षाचालकांवर कारवाई होताना दिसत नाही.

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे सॅटिस पुलाखाली रिक्षाथांबा उभारण्यात आला आहे. या थांब्यावरून दररोज हजारो प्रवासी रिक्षाप्रवास करतात. मात्र, रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे हा संपूर्ण परिसर कोंडीच्या विळख्यात सापडत आहे. थांब्याबाहेर रिक्षा उभ्या करणे, अवाजवी भाडे आकारणे, जवळची भाडी नाकारणे अशा कृत्यांमुळे रिक्षाचालकांबाबत प्रवासीवर्गात तीव्र नाराजी आहे. थांब्याचे नियम मोडून भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात महापालिका प्रशासनाची कारवाई सुरू असते. महापालिकेचे अधिकारी किंवा वाहतूक पोलिसांच्या कारवाईच्या वेळेत रिक्षाचालक स्थानक परिसरात शिस्तीने वाहतूक करतात. मात्र कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस स्थानक परिसरात नसल्यास रिक्षाचालकांचे बेताल वर्तन सुरू असते.

काही महिन्यांपूर्वी रिक्षावाहतूक सुरळीत व्हावी आणि वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी स्थानक परिसरात रिक्षा, टॅक्सी आणि दुचाकीसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली. यात एका मार्गातून केवळ रिक्षाची वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. अन्य मार्गिकेत केवळ टॅक्सी, दुचाकीसाठी आणि खासगी वाहनांसाठी अन्य मार्गिका करण्यात आली होती. मात्र रिक्षाचालक कारवाईची तमा न बाळगता रिक्षाचालक खासगी वाहनांच्या मार्गिकांमध्ये घुसखोरी करत आहेत. खासगी वाहनचालकांमध्ये यामुळे संभ्रम होत असून रिक्षाच्या मार्गिकेतून खासगी वाहनचालकही वाहतूक करत असल्याचे दिसत आहे. या परिसरात गर्दीच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. लोकमान्यनगर, खोपट, वागळे इस्टेट या ठिकाणी जाण्यासाठी शेअर रिक्षाचालकांना स्वतंत्र रिक्षा थांबा देण्यात आला आहे. मात्र सकाळी स्थानक परिसरातून वागळे इस्टेट, लोकमान्यनगर या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना रस्त्यातच अडवले जात आहे.

रिक्षाचालकांना भाडे घ्यायचे नसल्यास ते खासगी वाहनांच्या मार्गिकेतून जातात. खासगी वाहनेही जास्त रिक्षा नसल्यास रिक्षांच्या मार्गिकेतून जाऊ शकतात. रिक्षा थांबा सोडून प्रवाशांचा रस्ता अडवत रिक्षाचालक भाडे आकारत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येते.

– सुरेश लंभाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे नगर