रिक्षाचालकांच्या गुंडगिरीचा  अनुभव प्रत्येक प्रवाशाला येत असतो. ठाण्यात प्रीपेड रिक्षांसारख्या प्रवासाभिमुख सुविधांना प्रारंभ होत असतानाच कल्याणमध्ये रिक्षाचालकांची गुंडगिरी वाढत असल्याचे चित्र आहे. कल्याणमधील आग्रा रोड रस्त्यावरील गणेश टॉवर परिसरात असणाऱ्या रिक्षा थांब्यातील रिक्षा चालकांकडून प्रवाशांना भाडे नाकारले जातेच, पण भाडे नाकारतानाच प्रवाशांना चक्क दमदाटी होत असल्याचेही चित्र आहे.
कल्याणातील आग्रा रोड मार्गावर गणेश टॉवर परिसरात अधिकृत रिक्षा थांबा आहे. येथून कल्याण रेल्वे स्थानक परिसरात जाण्यासाठी त्याचप्रमाणे कल्याणातील इतर भागात जाण्याची सोय आहे. गणेश टॉवर ते कल्याण रेल्वे स्थानक या प्रवासासाठी  शेअर दरपत्रकानुसार १० रुपये प्रत्येकी दर आकारणे बंधनकारक आहे. गणेश टॉवर येथील रिक्षा चालकांची याठिकाणी मनमानी कारभार सुरू असतो, अशा तक्रारी आहेत. सकाळचा वेळ सोडल्यास गणेश टॉवर रिक्षा थांब्यातील रिक्षाचालक कल्याण रेल्वे स्थानक परिसरात जाण्यास उत्सुक नसतात. या रिक्षाचालकांना मेट्रो मॉल, खडकपाडा, सिनेमॅक्स, गोदरेज हील, डीमार्ट अशी लांबची व थेट भाडी हवी असतात.
शहरात दर आकारणी संदर्भात मीटर पद्धत नसल्यामुळे हे रिक्षा चालक मनाला वाटेल त्या प्रमाणे भाडे मागतात. शहराच्या या मध्यवर्ती ठिकाणी लाल चौकी, भिवंडी, कोन येथून येणाऱ्या रिक्षाचालकांचाही गराडा असतो. गणेश टॉवर येथील या रिक्षाचालकांच्या मनमानीस कंटाळून रिक्षा प्रवासी भिवंडी, कोन, लाल चौकीहून येणाऱ्या रिक्षावाल्यांशी आपल्या इच्छितस्थळी जाण्याविषयी विचारणा करतात. परंतु भिवंडी, कोन, लाल चौकीहून येणाऱ्या रिक्षा चालकांना गणेश टॉवर परिसरातील रिक्षाचालक दमदाटी करून पळवून लावत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत.

ही कसली मनमानी?
मला माझ्या मित्रांना मेट्रो मॉल येथे जायचे होते. त्यासाठी गणेश टॉवर परिसरातून लाल चौकी परिसराच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकास मेट्रो मॉलला जाण्यासंदर्भात विचारले. तो रिक्षाचालक तयार झाला खरा परंतु गणेश टॉवर येथील रिक्षाथांब्यातील एक रिक्षाचालक आमच्याजवळ येऊन आमच्याशी व त्या रिक्षाचालकाशी हुज्जत घालू लागला. मेट्रो मॉलला जायचे असल्यास गणेश टॉवर रिक्षाथांब्यातूनच रिक्षा पकडावी लागेल, अशी दमदाटी करून त्याने संबंधित रिक्षाचालकास हटकायला सुरूवात केली
मानस सोमण, कल्याण</p>

यासंबंधी कुठलीही तक्रार नाही
संबंधित प्रकरणाविषयी आमच्याकडे कुठलीही तक्रार आलेली नाही. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालक-मालक संघटनेचे प्रवासी तक्रार कार्यालय आहे. प्रवाशांनी आपल्या तक्रारी तिथे नोंदवाव्यात. संबंधित रिक्षाचालकावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे गणेश टॉवर परिसरात असणाऱ्या थांब्यातील रिक्षाचालकांकडून गैरवर्तन होत असल्यास पीडित रिक्षाचालकांनीही यासंबंधीची तक्रार रिक्षा चालक मालक संघटनेकडे करावी.
– प्रकाश पेणकर, अध्यक्ष,रिक्षा   चालक-मालक असोसिएशन

प्रवाशांचा वैयक्तिक प्रश्न
गणेश टॉवर परिसरात असणाऱ्या रिक्षाथांब्यातील रिक्षाचालकांची दररोज मनमानी सुरू असते. त्यांच्या वाटेला कोणत्याही रिक्षाप्रवाश्याला जावेसे वाटत नाही. कोणत्या रिक्षाने प्रवास करायचा हा प्रवाशांचा वैयक्तिक प्रश्न असून या मुजोर रिक्षाचालकांची
खोड मोडणे गरजेचे आहे
– मयुरेश आठवले, कल्याण

रिक्षा क्रमांकाची नोंद करावी!
संबंधित प्रकरणाविषयी कुठलीही तक्रार आलेली नाही. अशावेळी रिक्षा प्रवाशांनी अशा रिक्षांचा क्रमांक नोंद ठेवून वाहतूक पोलीस शाखेकडे किंवा संबंधित परिसरातील पोलीस स्थानकात तक्रार करणे आवश्यक आहे. संबंधित रिक्षाचालकाविरूद्ध योग्य ती कारवाई वाहतूक शाखेकडून करण्यात येईल
– विजय शिंदे, प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखा.