प्रवासी मिळवण्यासाठी कल्याण स्थानकात स्पर्धा

कल्याण येथील राज्य परिवहन सेवेच्या आगारात घूसखोरी करून एस.टी. कर्मचाऱ्यांना दादागिरीची भाषा करणाऱ्या रिक्षाचालकांनी आता प्रवासी मिळविण्यासाठी थेट रेल्वे स्थानकात घुसखोरी सुरू केली आहे.  विशेष म्हणजे, ज्या फलाट क्रमांक ‘एक’वर हे रिक्षाचालक वावरतात. त्या जागेपासून हाकेच्या अंतरावर रेल्वे स्थानकाच्या व्यवस्थापकांचे आणि अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. मात्र, रेल्वेकडून या रिक्षाचालकांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे.

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर रिक्षाचालक बेकायदा प्रवेश करून प्रवाशांना रिक्षा भाडय़ाविषयी विचारणा करत असल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. यासंबधी अनेक वेळा रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे प्रवाशांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, या रिक्षाचालकांविरोधात रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. प्रवासी कल्याणच्या फलाट क्रमांक एकवर पोहचताच रिक्षाचालक त्यांना गाठून कुठे जाणार याची विचारणा करतात. प्रवासी रिक्षाप्रवास करण्यास उत्सुक नसतानाही त्याच्यामागे रिक्षाचालकांची भुणभुण लागलेली दिसते.

कारवाई नाही

फलाटावर कल्याण रेल्वे स्थानकाच्या व्यवस्थापकांचे कार्यालय आहे. मात्र, विनातिकीट व अवैधपणे फलाटावर शिरणाऱ्या रिक्षाचालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी कल्याण एसटी आगारात घूसखोरी करणाऱ्या रिक्षाचालकांनी एसटी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती.