ठाण्यात रिक्षा वाहतूक सुरूच ; जयस्वालविरोधी आंदोलनाला सेनेचा खो

ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि त्यांच्या अंगरक्षकांनी केलेल्या मारहाणीचा निषेध म्हणून ठाण्यातील विविध रिक्षा संघटनांनी गुरुवारी पुकारलेला संप अवघ्या काही तासांत हवेत विरला. गेल्या काही दिवसांपासून जयस्वाल यांच्याशी जवळीक निर्माण झालेल्या शिवसेनेने आपल्या पक्षाच्या झेंडय़ाखालील रिक्षाचालकांना संपातून बाहेर पडण्याची सूचना दिली. त्यामुळे गुरुवारी ठाणे शहरातील रिक्षावाहतुकीवर फारसा परिणाम दिसला नाही. आयुक्तांच्या पाठीशी असल्याचे दाखवत शिवसेनाप्रणीत संघटनांच्या रिक्षा भगवे झेंडे लावून शहरभर फिरत होत्या.

ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना स्थानक परिसरात मारहाण झाल्यानंतर पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरू केली होती. यादरम्यानच जयस्वाल आणि त्यांच्या अंगरक्षकांनी हुज्जत घालणाऱ्या काही रिक्षाचालकांना चोप दिला होता. त्यामुळे जयस्वाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शहरातील विविध रिक्षा संघटनांनी गुरुवारी संप पुकारला होता. शिवसेनाप्रणीत संघटनांनीही या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, गुरुवारी सकाळी रिक्षाचालकांचा संप मोडण्यासाठी सेनेचे पदाधिकारी व नेते स्वत: रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. शिवसेनाप्रणीत संघटनांना या संपातून बाहेर पडण्याच्या सूचना रात्री उशिरा देण्यात आल्या होत्या. त्यानुसार रेल्वे स्थानक, वागळे इस्टेट, वर्तकनगर, कॅडबरी नाका, नितीन कंपनी यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत प्रवाशांसाठी रिक्षा उपलब्ध करून दिल्या.

ठाणे शहरातील काही रिक्षा संघटनांवर नगरसेवक तसेच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा वरचष्मा आहे. या नगरसेवकांना महापालिका वर्तुळातून संपात सहभागी होऊ नका, अशा सूचना करण्यात आल्या. त्यानुसार भाजपप्रणीत रिक्षा संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांनी संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. महापालिकेतील माजी नगरसेवक जितेंद्र इंदिसे यांच्या संघटनेने संपात सहभागी नसल्याचे पत्र बुधवारी रात्री उशिरा पोलीस उपायुक्तांना दिले. त्यामुळे हा संप पूर्णपणे अपयशी ठरला.

सकाळच्या प्रवाशांना फटका

रिक्षासंप दुपारनंतर मोडीत निघाला तरी, सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या ठाणेकरांना या संपाचा फटका बसला. वर्तकनगर, लोकमान्यनगर, वसंतविहार या लांबपल्ल्यावरून स्थानक परिसराकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांचे  रिक्षाअभावी हाल झाले. नेहमी गावदेवी, ठाणे रेल्वे स्थानक, बी-केबिन रस्त्यावर सकाळच्या वेळेत रिक्षांची गर्दी दिसत असली तरी बुधवारी रिक्षाचालकांच्या संपामुळे या परिसरात रिक्षांचे प्रमाण कमी दिसून आले. सकाळी बी-केबिनजवळ रिक्षांची सोय नसल्याने अनेक चाकरमान्यांनी कार्यालयात चालत जाण्याचा पर्याय निवडला.

‘टीएमटी’ही तैनात

पालिका प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांनी पुकारलेल्या संपाचा प्रवाशांना फटका बसू नये, यासाठी ठाणे परिवहन उपक्रमाने (टीएमटी) गुरुवारी जय्यत तयारी केली होती. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे परिवहनतर्फे स्थानकाजवळ सॅटिस पुलाखाली असणाऱ्या रिक्षा थांब्याशेजारीच बससेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. लोकमान्यनगर खारेगाव, वृंदावन सोसायटी, नितीन कंपनी या परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे परिवहनच्या ३४ बस दिवसभर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

सर्वसामान्य प्रवाशांसोबत मुजोरीने वागणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात कारवाई होत असेल तर त्यात गैर नाही. आधी प्रवाशांना वेठीस धरायचे आणि पुन्हा कारवाई झाली की बंदचे हत्यार उगारायचे अशी मनमानी शिवसेना सहन करणार नाही. ठाणेकरांच्या हितासाठी असले संप यापुढेही आम्ही मोडून काढू.

– नरेश म्हस्के, सभागृह नेते