ठाणे : मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे ६७ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून या बिनविरोध विजयी झाल्याविरोधात उमेदवारांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेते अविनाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हि याचिका फेटाळल्याचे वृत्त प्रसारित होताच त्यावर अविनाश यांनी स्पष्टीकरण देत हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. फेटाळण्यात आलेली याचिका माझी नव्हती तर, दुसर्याची होती, असेही त्यांनी म्हटले आहे.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ६७ महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले. या बिनविरोध निवडीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेते अविनाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात अन्य उमेदवारांना जबरदस्ती आणि प्रलोभने दाखवून सामूहिकरीत्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच, या सगळ्यांची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.
याशिवाय, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बिनविरोध विजयाचा दावा केलेल्या ६७ जागांवरील निकाल जाहीर करण्यास स्थगिती द्यावी. त्याचप्रमाणे, बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसाठी किमान मतांच्या अनिवार्यतेबाबत विशिष्ट तरतूद करण्यासाठी कायदा तयार करण्याचे आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मध्ये सुधारणा करण्याचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश द्यावेत, अशी मागणी देखील जाधव यांनी याचिकेत केली होती.
अविनाश जाधव यांनी दाखल केलेली हि याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याची वृत्त अनेक माध्यमांवर प्रसारित झालेले आहे. या वृत्तानंतर जाधव यांनी समाजमाध्यमावर येऊन या निकालाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पालिका निवडणुकीत बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांविरोधात मी याचिका दाखल केली होती. माझ्यासोबतच निवडणुक प्रकियेसंदर्भात अनेक याचिका दाखल झाल्या असून त्यापैकी ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी ‘नोटा’ या विषयासंदर्भात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
परंतु काही माध्यम माझी याचिका फेटाळली आणि मला दंड ठोठवला असे वृत्त प्रसारित करत आहे. काही राजकीय नेत्यांच्या मदतीने या बातम्या पसरविल्या जात आहेत. प्रत्यक्षात माझी याचिका फेटाळलेली नाही. त्याचबरोबर मला न्यायालयाने कुठलाही दंड ठोठावलेला नाही. त्यामुळे खोटी बातमी पसरवून का आणि ती बातम्या काढून टाका नाहीतर तुम्ही त्याद्वारे समाजात चुकीचा संदेश देत असल्याचे दिसून येईल, असे जाधव म्हणाले.
