scorecardresearch

जोगिला तलाव पुनर्जीवित प्रकल्प निधीच्या प्रतीक्षेत

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा जोगिला तलाव पुनर्जीवित करण्याच्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला सुमारे पाच कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध होत नसल्यामुळे हा प्रकल्प रखडल्याची बाब समोर आली आहे.

ठाणे : महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा जोगिला तलाव पुनर्जीवित करण्याच्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला सुमारे पाच कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध होत नसल्यामुळे हा प्रकल्प रखडल्याची बाब समोर आली आहे. या प्रकल्पासाठी तीन वर्षांपूर्वी तलावाच्या जागेवर असलेल्या झोपडय़ांचे अतिक्रमण हटवून बाधितांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले असले तरी या जागेवरील पालिका प्रभाग समितीची इमारत अद्यापही हटविण्यात आलेली नाही. उथळसर येथील ठाणे महापालिकेच्या प्रभाग समितीला लागूनच जोगिला तलाव होता. या तलावावर भूमाफियांनी भराव टाकून अतिक्रमण केले होते. त्यामुळे या तलावाचे अस्तित्व जवळपास नष्ट झाले होते. पालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्याची घोषणा डिसेंबर, २०१७ मध्ये केली होती. त्यासाठी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे हे सातत्याने पाठपुरावा करीत होते. या तलाव परिसरात जवळपास ३५७ झोपडय़ा थाटण्यात आल्या होत्या.

२००० सालापूर्वी झालेल्या झोपडय़ांना सरकारी संरक्षण असले तरी नियमानुसार तलाव क्षेत्रातील अतिक्रमणांना तो लाभ मिळत नाही. त्यामुळे पालिका कोणताही मोबदला न देता या झोपडय़ा जमीनदोस्त करू शकत होती. परंतु, संभाव्य विरोध लक्षात घेऊन पालिकेने या रहिवाशांचे बीएसयूपी योजनेतील घरांमध्ये कायस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. तसेच बीएसयूपीतील घरे उपलब्ध होईपर्यंत पालिका प्रशासनाने या रहिवाशांना एमएमआरडीएच्या भाडे तत्वावरील घरांमध्ये स्थलांतरित केले. त्यांचे अद्याप बीएसयूपी योजनेतील घरांमध्ये कायस्वरुपी पुनर्वसन करण्यात आलेले नाही. या जागेवरील झोपडय़ा हटविण्यात आल्या असल्या तरी तीन वर्षे उलटून तेथील पालिका प्रभाग समितीची इमारत अद्यापही हटविण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

२,६२५ चौरस मीटर जागेत पाण्याचे अस्तित्व

दुसऱ्या टप्प्यात तलावाला नवसंजीवनी देण्यासाठीचा आराखडा पालिका प्रशासनाने तयार केला होता. या ठिकाणी ५,५२५ चौरस मीटरचा भूखंड असून त्यापैकी २,६२५ चौरस मीटर जागेत पाण्याचे अस्तित्व असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार हा तलाव पुनरुज्जीवित करण्याचे नियोजन करण्यात होते. तलावाची खोली चार ते पाच मीटर इतकी करण्यात येणार आहे. परंतु निधी मिळत नसल्यामुळे ही कामे रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मूळ प्रकल्प काय?

‘निरी’च्या सल्ल्यानंतर नामशेष झालेला जोगिला तलावाला पुनर्जीवित करण्याचे काम ठाणे महापालिकेने तीन वर्षांपूर्वी सुरू केले होते. तलावाच्या ठिकाणी शुद्ध पाण्याचे झरे आढळून आले होते. या तलावात माती पुन्हा जाऊ नये म्हणून एका महिन्याच्या आत गॅबियन वॉलचे काम पूर्ण करण्यात येणार होते. तसेच डाव्या बाजूने तलावाचे विस्तारीकरण करण्याबरोबरच तलावाच्या समोर विकास आराखडय़ातील रस्त्याचे काम करण्यात येणार होते.  पहिल्या टप्प्यात येथील झोपडय़ा हटवून जागा मोकळी करण्याची कारवाई पालिकेने केली होती.

जोगिला तलाव पुनर्जीवित करण्याचा प्रकल्पासाठी निधी मिळावा यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु असून लवकरच हा निधी उपलब्ध होईल. तसेच येथील रहिवाशांचे एमएमआरडीएच्या घरांमध्ये तात्परते स्थलांतरीत करण्यात आले असून त्यांचे बीएसयुपी योजनेतील घरांमध्ये कायमस्वरुपी पुर्नवसन करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.

– सुधीर कोकाटे स्थानिक नगरसेवक

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Awaiting rehabilitation project funding ysh

ताज्या बातम्या