Ram Mandir in Dombivli Khambalpada: आपल्या घराच्या जवळ रामाचे मंदिर असावे, या पूर्वजांनी केलेल्या सूचनेचे पालन म्हणून डोंबिवली जवळील ठाकुर्ली खंबाळपाडा भागातील एका रामभक्ताने आपल्या घराजवळ प्रभू श्री रामाच्या मंदिराची उभारणी केली. या मंदिरात अयोध्येतील प्रभू श्री बालकरामाची (रामलल्ला) धार्मिक विधीतून प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, ध्वजारोहण केले. डोंबिवली, कल्याण, ठाणे परिसरातील रामभक्त भाविकांना या मंदिरात आल्यावर आपण अयोध्येत जाऊन श्री रामलल्लाचे दर्शन घेतल्याचे समाधान मिळेल हाही या मंदिर उभारणी मागील मुख्य उद्देश असल्याचे या मंदिराची उभारणी करणारे डोंबिवली खंबाळपाडा येथील रहिवासी अध्यात्मिक चिंतामणी पाटील यांनी सांगितले.

सद्गुरू नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या बैठकीचे सदस्य असलेले चिंतामणी पाटील मागील वीस वर्षापासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाजपयोगी उपक्रम राबवितात. वीस वर्षापासून आपल्याकडे प्रतिष्ठानचे अधिष्ठान आहे. नियमित उपासना, अध्यात्मिक कार्यक्रम आपल्याकडे सुरू असतात. आपल्या पूर्वजांनी घराजवळ एखादे मंदिर असावे असे बोलून दाखविले होते. तेव्हापासून परिस्थिती येईल त्यावेळी अशा मंदिराची आपण उभारणी करून पूर्वजांचे स्वप्न पूर्ण करू, असा ध्यास अध्यात्मिक चिंतामणी पाटील यांनी घेतला होता.

मूर्ती घडण, प्राणप्रतिष्ठा

अयोध्येतील श्री प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी कुटुंबीयांसह गेल्यानंतर संयोजक चिंतामणी पाटील यांना अयोध्येतील राम मंदिरातील श्री रामलल्लाची मूर्ती भावली. अशीच प्रसन्न मूर्ती आपल्या मंदिरात असावी असा ठाम विचार करून पाटील डोंबिवलीत घरी परतले. आपल्या घराजवळ मंदिराची उभारणी करून त्यात अयोध्येतील मूर्तीप्रमाणे रामलल्लाची हुबेहुब मूर्ती असावी असा विचार पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याजवळ बोलून दाखविला. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या सूचनेप्रमाणे पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाभोळ येथील नामवंत मूर्तिकार नागवर्धन गुडीगर यांच्याशी संपर्क साधला.

मूर्तिकार गुडीगर यांना आपणास रामभक्ताच्या सूचनेप्रमाणे अयोध्येतील रामलल्लाप्रमाणे मूर्ती घडविण्याची संधी मिळते, असा विचार करून अल्पावधीत प्रभू श्री रामलल्लाची मूर्ती घडवली. ही मूर्ती आपल्या घराजवळील रामंदिरात ठेवण्यासाठी चिंतामणी पाटील यांनी आपल्या शक्तीने आणि खंबाळपाडा ग्रामस्थ, योगा गट, काही रामभक्त यांच्या सहकार्याने मंदिराची उभारणी केली.

अयोध्यावासी परमपूज्य महंत महावीरदासजी सरस्वती महाराज, मठाधिपती श्री संत कबीरदासजी यांच्या हस्ते खंबाळपाडा येथे श्री रामल्लाची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण आणि ध्वजारोहण तीन दिवस पार पडले. डोंबिवली, ठाकुर्ली, खंबाळपाडा परिसरातील भक्तगण या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या मंदिरात येऊन प्रभू श्री रामलल्लाचे दर्शन घेतले.

‘अनेक रामभक्तांना विविध अडचणी, शरीर प्रकृती, दुर्धर आजारामुळे इच्छा असुनही अयोध्येत बालक रामाच्या दर्शनासाठी जाता येत नाही. अशा भक्तांची आपण अयोध्येत जावे अशी खूप ओढ असते. अशा रामभक्तांना खंबाळपाडा येथील रामलल्लाच्या मंदिरात येऊन आपला भक्तिभाव पूर्ण करता येणार आहे. ही अयोध्येची प्रतिकृती नाही. पण एक आत्मिक समाधान आणि आमच्या पूर्वजांनी केलेल्या सूचनेप्रमाणे या मंदिराची उभारणी घराच्या परिसरात केली आहे. नियमितच्या उपासने बरोबर प्रभू श्री बालकरामांची सेवा करण्याची संधी आम्हा कुटुंबीयांना मिळाली आहे” असे अध्यात्मिक चिंतामणी पाटील यांनी सांगितले.