कडोंमपा रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टरांना डावलून आयुर्वेदिक डॉक्टरांची वर्णी

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आस्थापनेवरील तज्ज्ञ एमबीबीएस डॉक्टरांच्या जागांवर नऊ आयुर्वेद (बीएएमएस) डॉक्टरांना महापालिका सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने न्यायालयीन आदेशाचा आधार घेत महासभेच्या मंजुरीसाठी ठेवला आहे. पालिका रुग्णालयातून दर्जेदार रुग्णसेवा मिळत नाही म्हणून ओरड होत असताना डॉक्टरांची नेमणुक करताना ही पदावनती कशासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वैद्यकीय संघटना, पालिका सेवेतील अ‍ॅलोपॅथी डॉक्टर खासगीत या नियुक्त्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. चुकीचा पायंडा प्रशासन पाडत आहे, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. २० वर्षांपूर्वी तत्कालीन महापालिका प्रशासक यु. पी. एस. मदान यांनी महापालिकेच्या  रुग्णालयात कार्यरत असलेले दोन ‘बीएएमएस’ डॉक्टर निवृत्त झाले की त्यानंतर आयुर्वेद डॉक्टरांची भरती करू नये असे पालिका नियमावलीत म्हटले आहे. या नियमांना बगल देत नऊ आयुर्वेद डॉक्टरांना पालिका सेवेत कायम स्वरूपी दाखल करून घेण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. यासाठी न्यायालयीन आदेशाचा आधार घेण्यात आला आहे. मंत्रालयात सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याने सेवेत असताना पालिका सेवेत आयुर्वेद डॉक्टरांची वर्णी कशी लागेल, अशा पद्धतीने काही नियमावली मागील पाच ते सहा वर्षांपूर्वी करून ठेवली. या शासकीय नियमावलीचा आधार घेत महापालिकेने आयुर्वेद डॉक्टर पालिकेत भरती करण्यासाठी घेतला. या निवृत्त सहसचिवाची मुलगी पालिकेत आयुर्वेद डॉक्टर म्हणून अस्थायी स्वरूपात कार्यरत आहे. काही पालिका पदाधिकारी, राजकीय शहरप्रमुख, पालिका अधिकारी यांचे नातेवाईक आयुर्वेद डॉक्टर पालिका सेवेत कायम होण्यासाठी प्रयत्नशील होते.

वैद्यकीय आरोग्य विभागाने दोन महिन्यापूर्वी या डॉक्टरांना सेवेत घेण्यासाठी एक गोषवारा सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला होता. त्यात फेरफार करून सुधारित गोषवारा सर्वसाधारणपुढे पाठविण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये पालिका सेवेत येण्यासाठी जे डॉक्टर वाढीव वयामुळे अपात्र ठरले होते. त्यामधील काही डॉक्टराना प्रशासनाने सेवेत दाखल करून घेतले आहे. तर चार डॉक्टरांना सेवेत घेण्यास नकार दिला आहे. डॉ. प्रतिभा पानपाटील या नोव्हेंबर २०१५मध्ये घेण्यात आलेल्या मुलाखती दरम्यान वाढीव वयामुळे अपात्र ठरल्या होत्या. यावेळी त्यांची वर्णी लागली आहे. पहिल्या गोषवाऱ्यात डॉ. प्रतिभा, डॉ. रश्मी ठाकूर यांची नावे नव्हती. मात्र, सुधारित गोषवाऱ्यात त्यांना सेवेत कायम करण्याच्या यादीत त्यांची नावे आली आहेत. महापालिका सेवेत मागील १० ते १५ वर्षांपासून कार्यरत असलेले डॉ. प्रितम आंबेकर, डॉ. शोभना लावणकर, डॉ. ममता लावणकर, डॉ. तृणाली महातेकर या डॉक्टरांना वाढीव वयाचे कारण देत सेवेत घेण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. आयुर्वेद डॉक्टरांना नऊ हजार ३०० ची वेतनश्रेणी द्या, असे वैद्यकीय विभागाचे मत होते. सामान्य प्रशासन विभागाने त्यांना १५ हजार ६०० ची वेतनश्रेणी लागू केली आहे.

येत्या शनिवारच्या महासभेत तीन अ‍ॅलोपॅथी आणि नऊ आयुर्वेद डॉक्टरांना सेवेत घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवला आहे.

न्यायालयात आव्हान देणार

मागील दाराने पालिका सेवेत भरती झालेल्या मुलाखतीत अपात्र ठरलेल्या डॉक्टरना सेवेत घेतले जाणार नाही, असे सत्यप्रतिज्ञा पत्र माजी आयुक्त ई. रवींद्रन यांनी उच्च न्यायालयात सादर केले होते. त्याच्या विरुद्ध भूमिका प्रशासनाने आता घेतली आहे. काही डॉक्टर मंडळींनी या सगळ्या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली असल्याचे समजते.

अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद डॉक्टरांना सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेने महासभेपुढे मान्यतेसाठी ठेवलेला आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही होईल.

सामान्य प्रशासन विभाग कडोंमपा.

काही त्रुटी गोषवाऱ्यात आहेत. प्रशासनाने नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या शंका, प्रश्न यांची सविस्तर माहिती द्यावी.  प्रशासनाला या प्रस्तावाचे सविस्तर विवेचन करावे लागेल. 

– मंदार हळबे, विरोधी पक्षनेता, कडोंमपा.