रस्त्यावरील मातीच्या धुराळ्यामुळे श्वसनाचे आजार होण्याची भिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: ठाणे आणि भिवंडी शहराच्या वेशीवर असलेल्या कशेळी-काल्हेर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले असून या भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कशेळी ते अंजुरफाटा या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. अवजड वाहनांसह इतर वाहनांची सतत वर्दळ सुरु असलेल्या या मार्गावर मोठे खड्डे पडले असून त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्ता उंच-सखल झाला आहे. यामु‌ळे वाहनांचा तोल जाऊन अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. याशिवाय, या रस्त्यावर मातीचा धुराळा उडत असल्याने नागरिकांना श्वसनाचे आजार होण्याची भिती व्यक्त असून अनेक नागरिक या मार्गावरून प्रवास करताना मुखपट्टीचा वापर करीत आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवली: खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने भागशाळा मैदानातील कोकण महोत्सवाची परवानगी रद्द, म्हणाले “मैदानाचा वापर…”

ठाणे आणि भिवंडी शहराच्या वेशीवरील कशेळी-काल्हेर या ग्रामीण भागाचे मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. या भागातून ठाणे आणि भिवंडी भागात जाण्यासाठी कशेळी-अंजुर फाटा हा एकमेव मार्ग आहे. याशिवाय, या भागात मोठ्या प्रमाणात विविध साहित्यांची गोदामे असून या ठिकाणी सतत अवजड वाहनांची वाहतूक सुरु असते. ही वाहनेही कशेळी-अंजुर फाटा मार्गेच वाहतूक करतात. या मार्गावर ठाणे, भिवंडी, कल्याण अशी मेट्रो मार्गिक तयार करण्याचे काम सुरु असून त्यामुळे हा रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली : पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून दबंगगिरी करणाऱ्या ठाकुर्लीतील बिल्डरला अटक

 कशेळी ते अंजुरफाटा या भिवंडी ग्रामीण भागातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. वाहनांची चाके खड्ड्यात रुततील असे खड्डे काही ठिकाणी आहेत. त्यातून वाट चुकवित वाहनचालकांना प्रवास करावा लागत आहे. उंच-सखल रस्ते आणि खड्डे यामुळे वाहनांचा तोल जाऊन ते उलटण्याची भिती व्यक्त होत आहे. यापुर्वी अशा घटना या मार्गावर घडल्या आहेत. पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे राडारोडा आणि काँक्रीटच्या साहय्याने बुजविण्यात आले होते. मात्र, हे खड्डे उखडल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून त्याचबरोबर सर्वत्र धुळधाण झाली आहे. धुळ प्रदुषण आणि खड्डे प्रवासामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच खड्डयांमुळे वाहनांचा वेग मंदावून जागोजागी वाहतूक कोंडी होत आहेत. दहा मिनीटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असल्यामुळे नागरिकांना या मार्गावरील प्र‌वास नकोसा वाटू लागल्याचे चित्र आहे.

कशेळी-काल्हेर रस्त्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या कामासाठी मागविलेल्या निविदांना अंतिम मान्यताही नुकतीच देण्यात आलेली आहे. कशेळी ते अंजूरफाटा दरम्यान ७.६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामे केली जाणार असून त्यापैकी ३.२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण, तर ४.५ किमी लांबीच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. याशिवाय, ७.४ किमी अंतरातील रस्त्यावर पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची सुधारणा केली जाणार आहे. तसेच मेट्रो मार्गाच्या मध्यभागी २०० वीजदिवे बसविले जाणार आहेत. पाऊस थांबून पंधरा दिवसांचा काळ लोटला तरी या कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bad condition of roads kasheli to anjurphatya motorists afflicted big potholes on the roads ysh
First published on: 01-11-2022 at 16:20 IST