scorecardresearch

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील रस्त्यांची दुरवस्था

रस्त्यावरील भुयारी गटार दुरुस्तीसाठी या भागात ठेकेदाराने काही कामे केली होती.

thane railway stn
(डोंबिवली पूर्व भागात नेहरु रस्त्यावरील चिमणी गल्लीच्या तिठ्यावर रस्त्याची दुरवस्था.)

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने या भागातून वाहन चालक वाहने हळू चालवित असल्याने वाहन कोंडी होते. वाहतूक विभागाने पालिका बांधकाम विभागाला वर्दळीच्या रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करुन घ्यावेत म्हणून मागणी केली आहे. रिक्षा चालक खड्ड्यांमुळे हैराण आहेत.डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर सर्वाधिक वर्दळीचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील नेहरु रस्त्यावरील चिमणी गल्ली तिठ्यावर काही महिन्यांपासून रस्त्याच्या मध्यभागी खड्डे पडले आहेत. या भागात रिक्षा वाहनतळ आहे. खासगी मोटार, दुचाकी वाहने या रस्त्यावरुन सतत येजा करतात. प्रवाशांना पायी येजा करताना या खडड्यांचा त्रास होत आहे. घाईत असलेला प्रवासी या खड्ड्यात पाय मुरगळून हमखास पडतो, असे या भागातील भाजी विक्रेत्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोंडीतून ठाणेकरांची आजपासून होणार सुटका, बहुप्रतिक्षित कोपरी रेल्वे पूलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण

या रस्त्यावरील भुयारी गटार दुरुस्तीसाठी या भागात ठेकेदाराने काही कामे केली होती. त्यावेळी भुयारी गटाराचे काम झाल्यानंतर रस्ते कामाच्या ठेकेदाराने खोदलेला रस्ता निकृष्ट दर्जाच्या डांबर खडीने भरला. या रस्त्यावरुन सतत वाहनांची येजा असल्याने या रस्त्याची आता दुरवस्था झाली आहे.
अशाच प्रकारे इंदिरा चौकातील स्कायवाॅकखाली मागील अनेक महिन्यांपासून रस्त्याच्या मध्यभागी भुयारी गटार व्दाराच्या बाजुला मोठी घळी पडली आहे. या घळीतून रिक्षा, दुचाकी, मोटारी नेताना चालकाला कसरत करावी लागते. अनेक वेळा चालक ही घळी चुकविण्यासाठी बाजुने वाहने नेतो. त्याचवेळी तेथून पादचारी जात असेल, दुसरे वाहन येत असेल तर अपघात होतो, असे या भागातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>विश्लेषण: संजय केळकर ठाणे भाजपमधील वाढत्या असंतोषाचे प्रतीक आहेत का?

पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालया भोवती रस्त्यांची ही परिस्थिती असल्याने पालिका अधिकाऱ्यांनी या दुरवस्थेची दखल घ्यावी, अशी मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे.डोंबिवली पश्चिम भागात गरीबाचापाडा, देवीचापाडा, नवापाडा भागात चोरीच्या जलवाहिन्या घेण्यासाठी प्लम्बर रात्रीच्या वेळेत रस्ता खोदून चाळी, इमारतीसाठी जलावाहिन्या घेतात. काम झाल्यानंतर खोदलेल्या चरीवर माती लोटून निघून जातात. ही खडी, माती सततच्या वाहन वर्दळीमुळे निघते. त्यावर मग वाहने घसरतात, असे वाहन चालकांनी सांगितले. देवीचापाडा येथे काळुबाई मंदिर, पार्वती निवास, शिव मंदिरासमोर सतत चोरीच्या जलवाहिन्या घेण्यासाठी रस्ता खोदण्यात येत असल्याने या रस्त्याची चाळण झाली आहे. गरीबाचापाडा येथे प्रकाश गुलाब म्हात्रे चौकात रस्त्याच्या मध्यभागी दोन ठिकाणी खोदण्यात आले होते. या खोदकामातील माती, खडी आता रस्त्यावर आली आहे. अशा प्रकारे चोरीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.बांधकाम विभागाच्या एका अभियंत्याने नेहरु रस्ता, इंदिरा चौक भागातील रस्ते कामे लवकरच हाती घेतली जाणार आहेत. त्यावेळी ही कामे पूर्ण केली जाणार आहेत, असे सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 11:36 IST