‘‘कोकणाने पिढय़ान्पिढय़ा महाराष्ट्राला प्रतिभा व प्रज्ञा दिली आहे. पु. भा. भावे, शं. ना. नवरे यांनी जो जिव्हाळा निर्माण केला तो आता दिसत नाही. साहित्य क्षेत्रातील आजचे राजकारण जटिल व वाईट झाले आहे,’’ अशी खंत ज्येष्ठ लेखक मधु मंगेश कर्णिक यांनी येथे व्यक्त केली.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य मित्र पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन रविवारी येथील बालभवनमध्ये करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कर्णिक यांनी वरील खंत व्यक्त केली. कर्णिक पुढे म्हणाले, ‘‘साहित्याच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांत कोकणाला काडीचेही स्थान मिळालेले नाही. साहित्याच्या नकाशावर कोकणचे नाव उमटण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. साहित्याने समाज एकत्र करता येतो, माणसे जोडता येतात.’’
कर्णिक यांच्या हस्ते साहित्य मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आले, तसेच डॉ. महेश केळुसकर यांना चित्रपट क्षेत्रात मिळालेल्या राज्य पुरस्काराबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शशिकांत तिरोडकर, वर्षां पाटील, डॉ. वसंत भूमकर, मनीष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.