बदलापूर : आगामी १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पूर्वतयारी आणि राज्यभरात साहित्याविषयी जनजागृती होण्यासाठी सध्या राज्यभरात ठिकठिकाणी १०० नांदी साहित्य संमेलने आयोजित केली जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून बदलापूर शहरात येत्या रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी अनुवाद या मुख्य विषयावर आधारित १३ वे एकदिवसीय नांदी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. बदलापूरकरांसाठी आणि साहित्यप्रेमींसाठी ही एक मोठी साहित्यिक मेजवानी ठरणार आहे.
हे संमेलन मराठी साहित्य परिषद, समर्थ युवा फाऊंडेशन, महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, बदलापूरचे ग्रंथसखा वाचनालय आणि कुळगाव बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. हे एकदिवसीय संमेलन रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत बदलापूर पश्चिमेतील बेलवली परिसरातील यशस्विनी भवन, साहित्य गौरव ग्रंथालय येथे पार पडणार आहे. या संमेलन स्थळाला कै. नानासाहेब चापेकर साहित्यनगरी असे नाव देण्यात आले असून, येथे दिवसभर अनुवादित साहित्य प्रकारावर सविस्तर आणि वैचारिक चर्चा रंगणार आहे.
दिग्गज साहित्यिकांची मांदियाळी
या १३ व्या नांदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ लेखक विद्याचरण पुरंदरे हे भूषविणार आहेत. तर, संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक भानू काळे आणि रवींद्र गुर्जर उपस्थित राहणार आहेत. तसेच, मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण आणि समर्थ युवा फाऊंडेशनचे राजेश पांडे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या संमेलनासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचेही सहकार्य लाभले असून, मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे हे या संमेलनाचे मार्गदर्शक आहेत. तर, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
अनुवाद प्रक्रिया, आव्हान विषयावर उहापोहा
मराठी साहित्यात अनुवाद या साहित्य प्रकाराचे महत्त्व मोठे आहे. इतर भाषांमधील दर्जेदार साहित्य मराठीत आणि मराठीतील साहित्य जगभर पोहोचवण्यात अनुवादाची भूमिका मोलाची असते. याच अनुवादाच्या प्रक्रियेवर, त्यातील आव्हानांवर आणि सद्यस्थितीवर या संमेलनात दिवसभर विविध सत्रांच्या माध्यमातून उहापोह केला जाणार आहे. बदलापूर आणि परिसरातील रसिक वाचक, नागरिक आणि साहित्यप्रेमींनी या साहित्य संमेलनाला उपस्थित राहून या वैचारिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन ग्रंथमित्र श्याम जोशी आणि आयोजकांनी केले आहे.
