कल्याण – बदलापूर येथील एका शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सह आरोपी असलेले शाळेचे विश्वस्त उदय कोतवाल, तुषार आपटे यांना पोलिसांनी गुरुवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने एका गुन्ह्यात दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला, तर याच प्रकरणातील अन्य गुन्ह्यात अधिकचा तपास होणेकामी दोन्ही आरोपींचा पोलिसांनी तात्काळ ताबा घेतला. त्यामुळे या आरोपींचा पोलीस ठाण्यातील मुक्काम वाढला आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचाराची घटना घडून अनेक दिवस उलटले तरी या प्रकरणातील सह आरोपी आपटे, कोतवाल पोलिसांना सापडत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना फैलावर घेतले होते. उच्च न्यायालय संतप्त झाल्याने पोलिसांनी शाळा विश्वस्तांमधील आरोपी उदय कोतवाल, तुषार आपटे यांना शोधण्याची प्रक्रिया वेगवान केली होती. ठाणे, बदलापूर येथील पोलीस पथके आरोपींचा शोध घेत होती. अखेर बुधवारी कर्जत परिसरातून रात्रीच्या वेळेत उदय कोतवाल, तुषार आपटे यांना पोलिसांनी अटक केली. रात्रभर या आरोपींचा ताबा पोलिसांकडे होता. या दोन्ही आरोपींना गुरुवारी दुपारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींतर्फे चंद्रकांत सोनवणे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षातर्फे आरोपींच्या जामिनाला जोरदार विरोध करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही आरोपींना एक गुन्ह्याच्या प्रकरणात तात्काळ जामीन मंजूर केला तर याच गुन्ह्यातील दुसऱ्या प्रकरणात जामीन फेटाळला. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही आरोपींचा तात्काळ ताबा घेतला.
हेही वाचा – बदलापुरात उमेदवारीवरून भाजपातच राडा, निरीक्षकांसमोरच यादीवरून कथोरे – पाटील गटात वाद
या प्रकरणातील सीसीटीव्ही चित्रण तपासणे, या प्रकरणात आरोपींचा असलेला सहभाग अशा अनेक विषयांवर तपास करायचा असल्याने या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असे ॲड. चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले.