अंबरनाथ : अंबरनाथ व बदलापूर या दोन्ही शहरांचा सध्या झपाट्याने विस्तार होत असून चहुबाजूंनी मोठमोठ्या गृहसंकुलांची उभारणी सुरू आहे. मात्र, वाढत्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर या दोन्ही शहरांच्या प्रशासनाच्या भूमिकेत मोठी तफावत दिसून येत आहे. बदलापूर नगरपालिकेने अतिक्रमणांविरोधात आक्रमक पवित्रा घेत धडक कारवाई सुरू केली असताना, अंबरनाथ नगरपालिका प्रशासन मात्र या गंभीर प्रश्नावर सोयीस्कर मौन बाळगून आहे. त्यामुळे अंबरनाथमधील अनधिकृत बांधकामांना नेमके कुणाचे अभय आहे, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वाढत्या नागरीकरणासोबतच दोन्ही शहरांमध्ये अतिक्रमणांची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी पालिका क्षेत्रातील आरक्षित भूखंडांवर बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. यावर उपाय म्हणून बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी अत्यंत कठोर भूमिका घेत अतिक्रमण हटावची विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील पूर्व आणि पश्चिम भागातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात येत आहे.

या कारवाईत स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोणताही राजकीय हस्तक्षेप न करता प्रशासनाला पूर्ण मोकळीक दिली. काही ठिकाणी कारवाईदरम्यान नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले, तरीही प्रशासनाने न जुमानता मोहीम सुरूच ठेवली. गेल्या आठवड्यात एका कारवाईदरम्यान माजी नगराध्यक्षांनी कारवाईस्थळी धाव घेतली. मात्र, पालिकेने कारवाईची भूमिका कायम ठेवली होती. त्यामुळे गेल्या अवघ्या आठवडाभरात २००हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त करून रस्ते मोकळे करण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे. बेकायदा बांधकामधारकांमध्ये धास्ती निर्माण करणाऱ्या या भूमिकेचे सर्वसामान्य बदलापूरकरांकडून जोरदार स्वागत होत आहे.

दुसरीकडे, अंबरनाथ शहरात मात्र याच्या अगदी उलट चित्र आहे. शहरात रस्त्यालगतची अतिक्रमणे, सार्वजनिक जागांवरील बेकायदा बांधकामे व आरक्षित भूखंडांवरील अतिक्रमणांमुळे शहराच्या भविष्यातील विकासाचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. अनधिकृत बांधकामांचे पेव फुटलेले असतानाही अंबरनाथ पालिकेकडून याविरोधात सातत्यपूर्ण कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बदलापुरात प्रशासन कारवाई करू शकते, तर अंबरनाथमध्ये कारवाई करण्यास प्रशासनावर कोणाचा दबाव आहे. या बांधकामांना राजकीय पाठबळ मिळत आहे का अशा चर्चांना आता उधाण आले आहे.

अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेत बदलापूरमधील लोकप्रतिनिधींनी जशी प्रशासनाला मोकळीक दिली, तशी ठाम भूमिका अंबरनाथमधील आमदार, नगराध्यक्षा व इतर लोकप्रतिनिधींकडून कधी घेतली जाणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या वाढत्या अतिक्रमणांच्या संदर्भात प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कोणताही प्रतिसाद दिला नाही.