Badlapur Ambernath Tourism: अंबरनाथ तालुक्यातील पर्यटनस्थळांवर येणाऱ्यांची पुरेशा सुविधांअभावी सध्या मोठी गैरसोय होत आहे. काही ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीत, तर काही ठिकाणी असलेली स्वच्छतागृहांची नीट निगा राखली जात नसल्याने महिलांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पर्यटनामुळे ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळत असली तरी सुविधांची वानवा असल्याने पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अंबरनाथ तालुक्यातील बदलापूरपासून काही अंतरावरील कोंडेश्वर येथील पावसाळी ओहोळ, मंदिर परिसरात पर्यटकांची गर्दी असते. या परिसरात जंगलातील धबधबे, मुळगावचे खंडोबा मंदिर, बारवी धरण परिसर पावसाळी पर्यटनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात. आठवड्याचे सातही दिवस पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. शुक्रवार ते रविवार या गर्दीमध्ये मोठी भर पडते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक पावसाळी सहलीत सहभागी होतात. मात्र, पर्यटनस्थळांवरील अपुऱ्या सुविधांमुळे पर्यटकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
कोंडेश्वर येथील मंदिराजवळ एक स्वच्छतागृह आहे. मात्र त्याची स्वच्छता होत नसल्याने तेथे दुर्गंधी पसरलेली असते. लगत दुसरे सार्वजनिक स्वच्छतागृह पर्यटकांसाठी नाही. त्यामुळे पुरूष उघड्यावर नैसर्गिक विधी उरकतात, मात्र महिलांना आडोसा शोधावा लागत असल्याची तक्रार काही महिलांनी केली. बारवी धरण परिसर वा आसपासच्या भागातही स्वच्छतागृहाची वानवा आहे.
अंबरनाथ तालुक्यातील मुळगाव परिसरात अनेक लहान मोठे ढाबे, ह़ॉटेल पर्यटकांना घरगुती जेवण पुरवतात. या हॉटेल, ढाबे मालकांकडून पर्यटकांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा दिली जाते. मात्र, अन्य पर्यटकांची येथे अडचण होते, अशी व्यथा काही नागरिकांनी मांडल्या.
वन पर्यटन केंद्रातही गैरसोय
बदलापुरजवळील वन पर्यटन केंद्र तथा जैव विविधता उद्यान पावसाळ्यात बहरते. मात्र येथेही स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. त्याची मोडतोड झाली असून शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या केंद्रात सुविधा नसल्याने एवढ्या मोठ्या प्रकल्पाकडे पर्यटक पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.
