बदलापूर : बदलापूर शहराच्या पश्चिमेतील स्थानक आणि बाजारपेठ परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने गेल्या आठवड्यात बेलवली आणि मांजर्ली परिसरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करत हातोडा चालवला. नागरिकांनी पालिकेच्या या रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईचे जोरदार स्वागत केले असले तरी, कारवाईनंतर रस्त्यावर पडलेला राडारोडा अद्याप हटवण्यात आलेला नाही. त्यामुळे सिग्नलजवळील पर्यायी मार्गिका आणि पदपथ पूर्णपणे बंद पडले असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांचा मोठा खोळंबा होत आहे.

शहराच्या पश्चिम भागात पूर्वेकडून किंवा अंबरनाथहून येणाऱ्या वाहनांना बदलापूर गाव, रमेशवाडी, हेंद्रेपाडा येथे जाण्यासाठी मुख्य बाजारपेठ आणि स्थानक परिसरातून जावे लागते. येथील सततची कोंडी टाळण्यासाठी बेलवली, मांजर्ली, गणेश चौक, हेंद्रेपाडा ते रमेशवाडी या समांतर मार्गाचे २५ मीटर रुंदीकरण प्रस्तावित आहे. याच रुंदीकरणातील अडथळे दूर करण्यासाठी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गेल्या आठवड्यात बेलवलीतील जीवन प्राधिकरण कार्यालयापासून ते मांजर्ली चौकापर्यंतची सुमारे ३० अनधिकृत दुकाने, खानावळी आणि टपऱ्या जमीनदोस्त केल्या होत्या.

या कारवाईमुळे रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, कारवाईला आठवडा उलटून गेल्यानंतरही तोडलेल्या बांधकामांचे साहित्य, विटा, पत्रे आणि राडारोडा रस्त्यावरच बेवारस स्थितीत पडून आहे. रस्त्यावर विखुरलेल्या या राडारोड्यामुळे सिग्नलला लागून असलेली वळणाची पर्यायी मार्गिका बंद झाली आहे. परिणामी, सिग्नलवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी केलेल्या कारवाईनंतर पुन्हा राडारोड्यामुळेच वाहनचालकांना ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागत आहे. याहीपेक्षा गंभीर अवस्था पादचाऱ्यांची झाली आहे.

प्रशासनाने रस्ता आणि पदपथ मोकळा करून द्यावा

पदपथांवर आणि रस्त्याच्या कडेला ढिगारे साचल्याने नागरिकांचा चालण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन मुख्य रस्त्यावरून वाहनांच्या गर्दीतून चालावे लागत असून, रस्ता ओलांडणे आणि पदपथावर पोहोचणे अत्यंत कठीण झाले आहे. अनधिकृत बांधकामे हटवताना त्यानंतर निर्माण होणारा राडारोडा तातडीने उचलण्याचे नियोजन नगर परिषदेने करणे अपेक्षित होते, मात्र प्रशासनाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे कारवाईचे स्वागत करणाऱ्या नागरिकांमधून आता रस्त्यावरील हा राडारोडा पालिका कधी हटवणार असा संतप्त सवाल विचारला जात असून, प्रशासनाने तातडीने रस्ता आणि पदपथ मोकळा करून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.