कल्याण – बदलापूर पश्चिमेतील न्यू वडवली परिसरात किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणातील खटल्यात कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हाणेकर यांनी मुख्य आरोपीला आठ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. मुख्य आरोपीला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरवले, तर दुसऱ्या आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. राजेश ऊर्फ चिड्या रमेश वाघे यांचा ७ नोव्हेंबर २०१८ रोजी रात्री बदलापूर पश्चिमेतील येथील न्यू वडवली येथील किराणा दुकानाजवळ झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता.

किरकोळ वादातून हा प्रकार घडला. अभियोग पक्षाच्या म्हणण्यानुसार, वाद वाढल्यानंतर दुसरा आरोपी सत्यवान बाळकृष्ण वाघे याने लाकडी दांडका आणून या गुन्ह्यातील आरोपी प्रवीण संतोष मुकणे याच्या हातात दिला. त्यानंतर मुकणे याने राजेश यांच्या डोक्यात दांडक्याने जोरदार प्रहार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने ११ साक्षीदार तपासले. यामध्ये मृताचे वडील, वैद्यकीय अधिकारी, पंच साक्षीदार आणि प्रत्यक्षदर्शींचा समावेश होता. वैद्यकीय अहवाल आणि शवविच्छेदन अहवालातून डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. बचाव पक्षाने आरोपांचा इन्कार करत साक्षीदारांच्या जबाबांमधील विसंगती आणि विलंबाच्या मुद्द्यांवर भर दिला.

न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षींचे परीक्षण करताना मुख्य आरोपीने केलेला हल्ला आणि त्याला त्याच्या परिणामांची असलेली जाणीव सिद्ध झाल्याचे नमूद केले. मात्र, खून करण्याचा पूर्वनियोजित हेतू सिद्ध होत नसल्याने भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ ऐवजी कलम ३०४ (भाग दोन) अंतर्गत प्रवीण मुकणे याला दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने त्याला आठ वर्षांचा सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आणखी दोन महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. ८ नोव्हेंबर २०१८ पासून न्यायालयीन कोठडीत घालवलेल्या कालावधीचा शिक्षेतून लाभ (सेट ऑफ) देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, दुसरा आरोपी सत्यवान बाळकृष्ण वाघे याची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली. तसेच मृताच्या अवलंबितांना नुकसानभरपाई देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला निर्देश देण्यात आले आहेत. या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. कादंबिनी एम. खंडागळे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली, तर आरोपींच्या वतीने अॅड. एस. एस. यादव यांनी काम पाहिले.