बदलापूरः गेल्याच आठवड्यात भाजपला धक्का देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाजपच्या महिला शहर अध्यक्ष दमयंती पवार यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे. काही गोष्टींबद्दल वाईट वाटल्याने तडकाफडकी निर्णय घेतला होता, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
तर भाजपची हीच खरी संस्कृती असून आपल्या लोकांना सामावून घेण्याची संस्कृती इतर कुठेही नाही, असे यावेळी आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. या पक्षप्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. मात्र दोनच दिवसात त्यांची घरवापसी झाली.
कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत एकमेकांचे पदाधिकारी, नाराज फोडण्यात मोठी संपर्धा लागली होती. गेल्या आठवड्यापर्यंत ही स्पर्धा जोरात होती. डोंबिवलीत शिंदेच्या शिवसेनेचे महत्वाचे पदाधिकारी फोडल्यानंतर थेट केंद्रीय मंत्री अमित शहांच्या कोर्टात या फोडाफोडीचा चेंडू गेला होता. त्यानंतर त्यांनी अशी फोडाफोडी थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र बदलापुर आणि अंबरनाथमध्ये ही फोडाफोडी अजुनही सुरूच आहे.
गेल्या आठवड्यात शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी भाजपच्या महिला शहर अध्यक्ष दमयंती पवार यांना शिवसेनेत प्रवेश दिला होता. त्यांच्या या प्रवेशाने शहरात एकच खळबळ उडाली. त्यांच्या जोडीला त्यांचे पती वैभव पवार यांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता. पवार कुटुंबीय भाजपचे जुने निष्ठावंत मानले जातात. ज्या भागात त्यांचे वास्तव्य आहे त्या भागात त्यांच्या जाण्याने भाजपला धक्का बसू शकत होता.
मात्र त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या काही तासातच भाजपातील वरिष्ठांनी धावाधाव सुरू केली. स्थानिक माजी नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांनी यात पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. त्यानंतर नुकताच दमयंती पवार यांची भाजपात घरवापसी करण्यात आली. यावेळी भाजप आमदार किसन कथोरे यांनी त्यांचे भाजपात स्वागत केले.
यावेळी बोलताना काही गोष्टींबद्दल वाईट वाटल्याने आपण शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय योग्य वाटत नव्हता. त्यामुळे पुन्हा भाजपात परतले. असा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी दिलगीरीही व्यक्त केली. तर भाजपने त्यांना पुनहा तात्काळ स्विकारल्याबद्दल त्यांनी आभारही मानले.
चर्चांना उधाण
भाजप महिला शहर अध्यक्षांच्या या शिवसेनेत जाण्याच्या निर्णयामुळे भाजपला धक्का बसला होता. तर त्याच्या दोनच दिवसांनंतर त्यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केल्याने शिवसेनेचे पदाधिकारी चक्रावले आहेत. शहरात या घरवापसीची जोरदार चर्चा सुरू आहे.
