बदलापूरः प्रभू श्री रामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बदलापूर पूर्व मंडळ अध्यक्ष प्रतिभा जाधव यांची मुलगी मृणाल जाधव यांच्यावर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृणाल हिने आपल्या इंस्टाग्राम खात्यावर स्टोरीमध्ये प्रभू श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर ही चित्रफीत शहरात वाऱ्यासारखी पसरली. हिंदुत्ववादी संघटनांनी याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी मृणाल जाधव या तरूणीला ताब्यात घेतले असून कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
मृणाल जाधव ही तरूणी बदलापूर शहर पूर्व मंडळ अध्यक्ष प्रतिभा जाधव यांची मुलगी आहे. या मुलीने चारचाकी कार चालवताना एक चित्रफित तयार केली. त्यात प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. ही चित्रफीत इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आली होती. त्यानंतर ही वेगाने समाज माध्यमांवर प्रसारीत झाली. याची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. शनिवारी सकाळी हिंदुत्ववादी संघटनानी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली होती.
त्यानंतर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनीही बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर याप्रकरणी मृणाल जाधव या तरूणीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. तसेच संबंधित चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारीत करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ही चित्रफीत प्रसारीत केल्यास प्रसारीत करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल केला जाईल, असाही इशारा गोरे यांनी दिला आहे.
या घटनेनंतर शहरातील विविध पक्षांंकडून संताप व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, भाजपच्या वतीने या घटनेनंतर तात्काळ कारवाई करण्यात आली. भाजपच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला. असे वक्तव्य निंदनीय आणि अस्विकारार्ह असून याप्रकरणी तात्काळ आणि कायद्यानुसार चौकशी करून कारवाई करण्यात यावी, असे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
तर पक्षाने प्रतिभा जाधव यांचा बदलापूर पूर्व मंडळ अध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला असून त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे, असेही भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच बदलापुरातील रिक्षा चालकांनी उत्स्फुर्त बंद पुकारला. खरवई परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तर प्रतिभा जाधव यांच्या कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
