बदलापूरः प्रभू श्री रामांबद्दल तरूणीने केलेले वक्तव्य अत्यंत आघात करणारे आहे. भाजप अशा गोष्टी खपवून घेत नाहीत. याची माहिती मिळताच संबंधित तरूणीच्या आईचा राजीनामा घेण्यात आला होता. त्यामुळे माझा नातेवाईक जरी असता तरी त्याला सोडले नसते, अशी प्रतिक्रिया भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांनी दिली आहे. बदलापुरात गेल्या आठवडाभरात समोर आलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांचा आढावा घेण्यासाठी त्या बदलापुरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तर स्थानिक वकील संघटनेने आरोपी तरूणीचे वकीलपत्र घेणार नाही, असे जाहीर केले आहे.
बदलापूर शहरातील भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याच्या मुलीने प्रभू श्री रामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून त्याविरूद्ध संताप व्यक्त करण्यात आला. या मुलीच्या आईला अर्थाक भाजपच्या मंडळ अध्यक्ष महिलेला भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रमुख आणि आमदार चित्रा वाघ यांच्या हस्ते तीन महिन्यांपूर्वी नियुक्तीपत्र देण्यात आले होते. त्यामुळे वाघ यांच्यावरही समाज माध्यमांवर टीका होत होती.
यावर चित्रा वाघ यांनी स्पष्टीकरण दिले. निवडणुकीच्या काळात बदलापुरात आले असताना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी आपण नव्या नियुक्त्या केल्या असून तुमच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊ, असे मला सांगण्यात आले. माझा तितकाच संबंध होता, असे चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच अशा प्रकारांना भाजपात थारा नाही. त्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. बदलापुरात गेल्या काही दिवसात घडलेल्या विविध घटनांचा आढावा यावेळी त्यांनी घेतला.
शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आता नगर परिषदेने पुढाकार घ्यावा. ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात त्यांच्यावर वेळीच नियंत्रण ठेवा. लोकसहभाग वाढवून अशा गोष्टींना आळा घाला, अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या. भाजप महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन बारकाईने लक्ष ठेवा असेही त्या म्हणाल्या.
वकील संघटना आक्रमक
अंबरनाथ चिखलोली वकील संघटनेच्या वतीने रविवारी या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. अंबरनाथ चिखलोली वकील संघटनेच्या वतीने संबंधित तरूणीचे वकिलपत्र न घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्रियेश जाधव यांनी दिली. संबंधित तरूणीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून सोमवारी या तरूणीच्या जामीनावर सुनावणी होणार आहे. त्या जामीनाला स्थानिक वकील विरोध करतील, अशीही माहिती जाधव यांनी दिली.
