Badlapur News: बदलापूर शहराच्या पाणी पुरवठा योजनेची निविदा येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे. मात्र बदलापूर शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याची गरज अधिक आहे. त्यामुळे येत्या काळात बदलापूर नगर परिषदेला स्वतःची धरणे असावीत या हेतूने नियोजन सुरू केले आहे. बदलापुरजवळ नंबरवाडी, इंदगाव आणि चिंचवली येथे तीन लहान धरणे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यातून येत्या काळआत ५० ते ६० दशलक्ष लीटर पाणी मिळेल अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. बदलापूर शहरातील मलवाहिनी स्वच्छता करणाऱ्या वाहनांच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
कुळगाव बदलापूर नगरपरिषदेला प्राप्त झालेल्या मलवाहिनी स्वच्छता करणाऱ्या अत्याधुनिक १८.५ टन क्षमतेच्या दोन सक्शन कम जेटिंग यंत्रवाहनाचे लोकार्पण नुकतेच संपन्न झाले. यावेळी आमदार किसन कथोरे यांच्यासह कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रूचिता घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियांका दामले उपस्थित होत्या. यावेळी बोलताना पाणी पुरवठा सभापती शैलेश वडनेरे यांनी शहरासाठी नवे धरण हवे आहे अशी मागणी केली. त्यावर बोलताना आमदार किसन कथोरे यांनी भविष्यात बदलापूर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार असून त्यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगितले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदलापूरची शहराची पाणीपुरवठा योजना मागे पडली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला गती दिली. येत्या काही दिवसात या कामाच्या निविदा जाहीर केल्या जातील. त्यानंतर सहा महिन्यात योजनेचे काम बहुतांश प्रमाणात मार्गी लागेल. त्यामुळे शहराची पाणी समस्या कमी होईल, असे कथोरे म्हणाले. मात्र फक्त योजना नाही तर शहराची येत्या वर्षातली पाण्याची तहाण भागवण्यासाठी नियोजन केले आहे. बदलापूर शहरासाठी आसपासच्या भागात तीन लहान धरणांचा प्रस्ताव आहे.
या धरणांच्या माध्यमातून ५० ते ६० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होईल, असे कथोरे यावेळी म्हणाले. अंबरनाथ तालुक्यातील नंबरवाडी, इंदगाव आणि चिंचवली येथे ही तीन लहान धरणे उभारली जातील. त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. तुम्हीही त्यासाठी पाठपुरावा करावा असेही आवाहन यावेळी कथोरे यांनी केले. बदलापूर शहरासाठी बारवी, पोशीर, काळू या धरणांमधूनही शहरांसाठी पाणी मिळणारच आहे. पण तरीही नव्या धरणांसाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे कथोरे म्हणाले.
शिवसेनेला टोला शहर विकासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. शिवसेनेचे गटनेते आमच्यासोबतच आहेत, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. या कार्यक्रमात शिवसेनेचे गटनेते श्रीधर पाटीलही उपस्थित होते. यावेळी कथोरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेबद्दलही वक्तव्य केले. पालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना विरूद्ध भाजप असा थेट सामना होता. त्यावेळी कथोरेंनी शिवसेनेला विरोध नाही पण त्यातील काही लोकांची भूमिका अयोग्य वाटते असे वक्तव्य केले होते. शिंदेंचे खरे समर्थक आजही माझ्यासोबत आहेत असेही कथोरे यावेळी म्हणाले.

