बदलापूर: ठाणे जिल्हा आणि आसपासच्या परिसरात गुरुवारी (११ डिसेंबर) किमान तापमानात मोठी घसरण नोंदवली गेली असून, हा दिवस यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस ठरला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेच्या लाटेमुळे तापमानात घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे बदलापूर, कर्जत, कल्याण, डोंबिवलीसह कोकणातील अनेक भाग एक अंकी किमान तापमानात नोंदले गेले.

विशेष म्हणजे महाबळेश्वर (११.१ अंश सेल्सिअस) आणि माथेरान (१७.४ अंश सेल्सिअस ) या पर्वतीय पर्यटनस्थळांपेक्षाही बदलापूरचे तापमान सर्वात कमी असल्याचे दिसून आले आहे. बदलापुरात गुरुवारी सकाळी १०.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले असल्याचे खासगी हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी सांगितले आहे. या घसरलेल्या तापमानामुळे कोकणाबरोबरच ठाणे जिल्ह्यातही गारठा वाढल्याची अनुभूती नागरिकांनी घेतली. सकाळच्या वेळेस दवबिंदू, थंडगार वारे आणि धुक्याची हलकी चादर अशी हिवाळ्याचा अनुभव जाणवत होता.

यंदाच्या वर्षात जवळपास सहा महिने लांबलेला पावसाळा आणि यादरम्यान थंड वातावरणामुळे पावसाळा आणि हिवाळा एकच वेळ जाणवत होता. ऐन दिवाळीत पाऊस सुरू होता. त्यानंतर पाऊस नसला तरी वातावरणात गारवा नव्हता. नोव्हेंबर महिन्यात खऱ्या हिवाळ्याला सुरुवात झाली. महिन्याच्या मध्यात चांगली थंडी जाणवली होती . नंतर तापमानात वाढ दिसून आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवते आहे. या आठवड्यात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार सोमवारपासूनच थंडी जाणवू लागली. गुरुवारीही तापमानात मोठी घट नोंदवली गेली.

आगामी हवामानाबाबत खासगी हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही थंडी रविवारपर्यंत कायम राहणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या व थंड हवेच्या प्रवाहामुळे तापमानात आणखी किंचित घसरण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र रविवारीनंतर तापमानात हळूहळू वाढ सुरू होईल आणि थंडी कमी जाणवेल, असेही मोडक यांनी स्पष्ट केले. सलग काही दिवसांनी झालेली तापमानातील घसरण, त्यात बदलापूरसारख्या शहरात तापमानातील घट या सर्वामुळे हिवाळ्याची कडाक्याची चाहूल यंदा प्रकर्षाने जाणवत आहे.

गुरुवारची किमान तापमानाची आकडेवारी

बदलापूर : १०.७ अंश सेल्सिअस
कर्जत : १०.८ अंश सेल्सिअस
महाबळेश्वर : ११.१ अंश सेल्सिअस
मनोर : ११.४ अंश सेल्सिअस
लोणावळा : ११.९ अंश सेल्सिअस
कल्याण व पनवेल : १३ अंश सेल्सिअस
डोंबिवली : १३.७ अंश सेल्सिअस
विरार : १४ अंश सेल्सिअस
नवी मुंबई : १४.२ अंश सेल्सिअस
ठाणे : १४.६ अंश सेल्सिअस
मुंबई (SCZ) : १५.६ अंश सेल्सिअस
माथेरान : १७.४ अंश सेल्सिअस