बदलापूर: तुम्ही हॉटेल किंवा टपरीवर चहा प्यायला गेल्यावर तो ‘थंड’ आहे अशी तक्रार करता का? तर सावधान! बदलापूरमध्ये केवळ चहा थंड असल्याचं सांगितल्यामुळे एका ग्राहकाला चक्क रुग्णालयाची पायरी चढावी लागली आहे. रागाच्या भरात चहावाल्याने ग्राहकाच्या कपाळावर चहाचा टोप मारलाच, पण वरून अंगावर उकळता चहा ओतून त्यांना भाजल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

बदलापूर पश्चिमेकडील एरंजाड भागात राहणारे मधुकर म्हसकर (५४) हे त्यांचे मामा हरिश्चंद्र मेहर यांच्यासोबत संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास स्वामी समर्थ चौक येथील कर्जत टी स्टॉल या चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी गेले होते. चहा पिल्यानंतर तो थंड वाटल्याने म्हसकर यांनी सहज तशी तक्रार केली. मात्र, ही साधी तक्रार चहावाल्याच्या इतकी जिव्हारी लागेल असं कोणालाही वाटलं नव्हतं.

चहा थंड असल्याचं ऐकताच दुकानात काम करणाऱ्या मुलाचा पारा चढला. त्याने म्हसकर यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत आज तुला दाखवतो, तुझी खैर नाही, अशी धमकी दिली. इतक्यात दुकानाचा मालक विठ्ठल याने संतापाच्या भरात गॅसवर असलेला गरम चहाचा टोप थेट म्हसकर यांच्या कपाळावर मारला. एवढ्यावरच न थांबता, दुसऱ्या टोपातील उकळता चहासुद्धा त्यांच्या अंगावर ओतला. या प्रकारामुळे म्हसकर गोंधळले.

या हल्ल्यात म्हसकर यांचा डावा भाग आणि पाठ गंभीररीत्या भाजली आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या वृद्ध मामांनाही चहावाल्याच्या मुलाने मारहाण केली.

या भयानक प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मधुकर म्हसकर यांच्या तक्रारीवरून बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात चहा दुकानाचा चालक विठ्ठल आणि कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तलवाडे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अशा प्रकारे ग्राहकावर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.