Badlapur Crime News : बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार ( Badlapur Crime ) झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर बदलापूरमध्ये कडकडीत बंद पाळला जातो आहे. त्याचप्रमाणे बदलापूरमधले नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपीला फाशी द्या अशी मागणी होते आहे. बदलापूर येथील रेल्वे स्थानकावरही शेकडो आंदोलक जमा झाले असून त्यांनी रेल रोको केला आहे. अशातच महिला आंदोलक आक्रमक झाल्या आहेत.
बदलापूर रेल्वे स्थानक आणि शाळेबाहेर आंदोलन
बदलापूर रेल्वे स्थानकावरही शेकडो आंदोलक जमा झाले असून त्यांनी सर्व रेल्वे रोखून धरल्या आहेत. याच आंदोलनातील काही महिलांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढले आहेत. आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे. तुमचे दीड हजार रुपये आम्हाला नको आहेत. आमच्या मुलीच सुरक्षित ( Badlapur Crime ) नसतील तर आम्ही काय करावं? असा संतप्त सवाल या महिलांनी महायुती सरकारला विचारला आहे.
लाडकी बहीण या योजनेचा संदर्भ देत काही महिलांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
“आम्हाला दहीहंडी नको, दहीहंडीच्या कार्यक्रमात सेलिब्रिटी नकोत. लाडकी बहीण योजना आणि तिचे १५०० रुपयेही नकोत. पीडित मुलींना ( Badlapur Crime ) न्याय द्या ही आमची मागणी आहे. अशा प्रसंगात तुम्ही राजकारणी लोक इथे येऊ शकत नाही तर तुमचा काय फायदा? आम्हाला लाडक्या बहिणी म्हणता मग आमच्या मुलींना न्याय कोण देणार? आम्हाला तुमचा पैसा नको आहे. आमच्या मुलींना बाहेर कसं काढायचं? रोज मुलांना आम्ही बॅड टच आणि गुड टच शिकवतो. पण नराधमांना कळत नाही. मी सगळ्या महिलांना सांगेन की मुलांना गुड टच आणि बॅड टच शिकवा. समोरच्या महिलेचा, स्त्रीचा, लहान मुलीचा सन्मान करा.” ही मागणी महिला वर्गाने केली आहे.
बदलापूरचं प्रकरण नेमकं काय? मुख्यमंत्री काय म्हणाले?
बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थींनीवर अत्याचार ( Badlapur Crime ) झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि. २० ऑगस्ट) हजारो बदलापूरकर नागरिक रस्त्यावर उतरले. सकाळपासून पालकांनी आदर्श शाळेबाहेर आंदोलन सुरू केले. तर काही नागरिकांनी उपनगरीय रेल्वेची वाहतूक रोखून धरली, त्यामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी सदर प्रकरणातील आरोपीला अटक केल्याची माहिती दिली. तसेच आरोपींना लवकर शिक्षा मिळावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात सुनावणीसाठी घेतले जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हे पण वाचा- बदलापूरात आंदोलकांचा रेल रोको, कर्जत-बदलापूर रेल्वे सेवा ठप्प
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पोलीस आयुक्तांशी मी चर्चा केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली असून त्यावर खुनाचा प्रयत्न, बलात्काराचा प्रयत्न, पोक्सो अशी कठोर कलमे लावण्याचे आदेश दिले आहेत. जलदगती न्यायालयात हा खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहीजे, असे निर्देश मी दिले आहेत. जेणेकरून पुन्हा कुणी असे धाडस करणार नाही. तसेच संस्था चालकांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संस्थाचालकांनी कर्मचाऱ्याला कामाला ठेवण्याआधी त्याची पार्श्वभूमी तपासणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच नियमावली जाहीर केली जाईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.