बदलापूर : बदलापूर शहरात सध्याच्या घडीला सक्षम रक्त साठवणूक केंद्र नाही. त्यामुळे नागरिकांना कल्याण, ठाणे येथील साठवणूक केंद्रांवर आणि रक्तपेढ्यांवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे ऐन गरजेच्या काळात रूग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होते. बदलापुरात रक्त साठवणूक केंद्र सुरू करण्यासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेने हालचाली सुरू केल्या असून कै. दुबे रूग्णालयात आता रक्त साठवणूक केंद्रासाठी जागा दिली जाणार आहे.

रूग्णालयावर असलेले परिषदेचे प्रशासकीय कार्यालय हलवण्यात आल्याने ही जागा रिक्त आहे. ती पहिल्या मजल्यावरील जागा रक्तपेढी संस्थेला देण्याचा परिषदेचा मानस आहे.

बदलापूर शहराची लोकसंख्या चार लाखांवर पोहोचली आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक स्थलांतरीत होत आहेत. मात्र शहरात अत्याधुनिक उपचार मिळतील अशी अद्याप व्यवस्था नाही. त्यासोबतच रूग्णाला रक्ताचा पुरवठा करावा लागला तर त्यासाठी सक्षम पर्याय नाही. बदलापुरात शहरात रक्त साठवणूक केंद्र अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना कल्याण, डोंबिवली, ठाणे किंवा मुंबईत रक्तासाठी धावाधाव करावी लागते. यात रूग्णांच्या नातेवाईकांची फरफट होते. त्यामुळे शहरात रक्त साठवणूक केंद्र असावे अशी मागणी होती.

त्याचवेळी बदलापूर शहरात ना नफा ना तोटा तत्वावर रक्त साठवणूक केंद्र सुरू करण्यासाठी माया रक्तपेढी या संस्थेने उत्सुकता दाखवली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या नियमावलीनुसार रक्तपेढी करिता सुमारे २०० चौरस फुटाची जागा असावी लागते. सध्याच्या घडीला नगर परिषदेचे जुने प्रशासकीय कार्यालय असलेले कै. दुबे रूग्णालयाचा पहिला मजला रिक्त आहे. नव्या प्रशासकीय इमारतीत नगर परिषदेचा कारभार हलवण्यात आल्याने या ठिकाणची जागा रक्तपेढीसाठी उपलब्ध करून देण्याचा नगर परिषदेचा मानस आहे.

येत्या २२ एप्रिल रोजी होणाऱ्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत याबाबतच्या विषयाला मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. हे रक्त साठवणूक केंद्र झाल्यास बदलापुरकरांना त्याचा मोठा फायदा होईल. त्याचप्रमाणे नागरिकांची होणारी फरफटही थांबणार आहे. त्याचवेळी या रक्त साठवणूक केंद्रातून नागरिकांना महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या निकषांनुसार ठरवून दिलेल्या दरानेच रक्त उपलब्ध होईल. त्यामुळे सरकारी दरानेच बदलापुरात रक्त उपलब्ध झाल्याने त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होईल.

जागा उपलब्ध होणार

केै. दुबे रूग्णालयासाठी दिलेली जागा कालांतराने कुळगाव बदलापूर नगर परिषदेने वापरण्यासाठी घेतली होती. अत्यंत दाटीवाटीमध्ये अनेक वर्ष नगर परिषदेचा कारभार चालला. त्यात नव्या प्रशासकीय इमारतीच्या जागेचा खटला सुरू राहिल्याने त्यास विलंबही झाला. त्यामुळे अगदी चिंचोळ्या भागात परिषदेचे काम सुरू होते. आता ही जागा उपलब्ध असून त्यात किरकोळ दुरूस्ती करावी लागणार आहे. त्यामुळे याबाबत निर्णय झाल्यास काही महिन्यात शहरात नवे रक्त साठवणूक केंद्र सुरू होऊ शकेल.