बदलापूरः बदलापूर शहरात उघडकीस आलेल्या स्त्री बीज विक्रीच्या अवैध प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली असून त्यात एक महिला सोनोग्राफी केंद्रात काम करत होती. तर दुसरा आरोपी हा औषध विक्रेता आहे. उल्हासनगरातील त्या सोनोग्राफी केंद्रावरही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार महिलांना, एका पुरूष आरोपीला अटक झाली असून त्यांच्या चौकशीत या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

अवैधरित्या स्त्री बीज विक्रीचे प्रकरण बदलापुरात समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी तीन महिलांना अटक केल्यानंतर आणखी एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला उल्हासनगरातील एका सोनोग्राफी केंद्रात काम करत होती. या केंद्रात महिलांची तपासणी केली जात असल्याचा संशय आहे. या कारवाईत संबंधित सोनोग्राफी केंद्राला टाळे ठोकण्यात आले आहे. तर विठ्ठलवाडी भागातून एका औषध विक्रेत्यालाही अटक करण्यात आली आहे. हा औषध विक्रेता कोणत्याही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय स्त्री बीजासंबंधीची औषधे देत होता, असा त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे बदलापूर पूर्व पोलिसांनी तपासाअंती त्याला अटक केली आहे. या सर्व आरोपींनी बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

या प्रकरणाच्या चौकशीत आता अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. स्त्री बीज विक्री करण्यापूर्वी स्त्रीबीज विक्री करणाऱ्या महिलेला कोणत्याही वैद्यकीय खबरदारीशिवाय इंजेक्शन दिले जात होते. ज्या महिला पैशांसाठी तयार होत्या त्यांच्या जीवाशी खेळ सुरू होता. कायद्यानुसार स्त्री बीज विक्री करत असताना शासनाच्या अटी पूर्ण कराव्या लागतात. तसेच हे स्त्री बीज फक्त अधिकृत केंद्रातच दिले जाऊ शकते. विशेष म्हणजे एखादी महिला एकदाच हे स्त्री बीज देऊ शकते. मात्र या प्रकरणात काही महिला एकापेक्षा अनेक वेळा दाता म्हणून समोर आल्या होत्या. त्यांना अनेकदा स्त्री बीज निर्मितीसाठी इंजेक्शनची मात्रा दिली गेली होती, अशीही माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणी आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

कशी होती स्त्री बीज विक्रिची प्रक्रिया

स्त्री बीज विक्री करू इच्छिणाऱ्या महिलांना सलग दहा दिवस स्त्री बीज (अंडाणू) तयार होण्यासाठी इंजेक्शन दिले जातात. त्यानंतर बीज परिपक्व (मॅच्युरेशन) होण्यासाठी आणखी एक (ट्रीगर इंजेक्शन) इंजेक्शन दिले जाते. ३६ तासांनी हलकी भूल देऊन हे स्त्री बीज काढले जाते. त्यानंतर पुरूषाच्या मदतीने शुक्राणू आणि स्त्री बीज प्रक्रिया ( एम्ब्रिओ) केली जाते. त्यानंतर हे एम्ब्रिओ महिलेच्या शरीरात साडले जाते. त्यानंतर गर्भधारणा होते, अशी माहिती यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे. या प्रक्रियेत महिलेची सातत्याने आरोग्य तपासणी आणि निरिक्षण करणे गरजेचे असते. मात्र वरील प्रकरणात हे केले गेलेले नाही. त्यामुळे हा प्रकार जीवघेणाही होऊ शकतो, असे यातील तज्ज्ञ सांगतात.