बदलापूरः करणी, पिशाच्च आणि मृत्यूची भीती दाखवत पूजाविधीच्या नावाखाली एका ६७ वर्षीय वृद्धाची तब्बल पावणे दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना बदलापुरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार भोंदू ज्योतिषांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे.

शिवलिंग इंगळे, रोहित शिंदे, ब्रम्हदत इंगळे आणि भवानी इंगळे अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे असून त्यांना बदलापुरातून ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गज्जल यांनी दिली. या चौघांसह आणखी एका साथीदाराने संगनमताने ही फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार अनेकदा समोर येत असतात. मात्र तरीही नागरिक भावनेच्या आहारी जाऊन पुन्हा नव्या फसवणुकीत भाग होतात. असाच एक प्रकार बदलापुरातून समोर आला आहे. मुंबईत वास्तव्यास असलेले चंद्रकांत चिले (वय ६७) हे वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त बदलापुरात आले असताना आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला.

वेळोवेळी भेटून तुमच्या घरावर गंभीर संकट आहे, कोणीतरी करणी केली असून पिशाच्च सोडले आहे अशी भीती त्यांना आणि त्यांच्या पत्नीला दाखवण्यात आली. तसेच लवकरात लवकर विशेष पूजाविधी केला नाही तर तुमच्या मुलाप्रमाणे मुलीचाही मृत्यू होईल, असा धाक दाखवत त्यांची दिशाभूल करण्यात आली.

हे कथित संकट दूर करण्यासाठी कामाख्या देवीच्या ठिकाणी जाऊन पूजाविधी करावा लागेल, असे सांगण्यात आले. त्यासाठी दीड-दीड तोळ्यांचे चार सोन्याचे खिळे आवश्यक असून हवन पूर्ण झाल्यानंतर ते परत मिळतील, अशीही बतावणी करण्यात आली. या कारणावरून आरोपींनी चिले यांच्याकडून वेळोवेळी एकूण ९ लाख ७८ हजार रुपये किंमतीचे दागिने आणि रोख रक्कम उकळली.

मात्र पैशांची मागणी सुरूच राहिल्याने आपली फसवणूक झाल्याची जाणीव चिले यांना झाली. त्यांनी तत्काळ बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा नोंद झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत आरोपींना अटक केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी अशा बतावणी आणि भीतीला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे. तसेच अशाच प्रकारे आणखी कुणाची फसवणूक झाली असेल तर पुढे येण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.