बदलापूर : बदलापूर शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरील खड्ड्यांची समस्या गंभीर बनत चालली आहे. दररोज हजारो शालेय विद्यार्थी, वाहन चालक उड्डाणपुलावर अडकून पडत आहेत. दरवर्षी एकाच ठिकाणी खड्ड्यांची संख्या अधिक असते. यावरून नगर परिषद प्रशासनाविरोधात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. उड्डाणपुलावरील भल्यामोठ्या खड्ड्याचा तिसरा वाढदिवस ‘मविआ’च्या वतीने साजरा करण्यात आला.
‘लाडक्या खड्ड्याला तिसऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ असे फलक लावून, रस्त्यावरील खड्ड्याजवळ केक कापून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. एकीकडे बदलापूरची स्वतंत्र महापालिका करण्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी राज्य सरकारकडे मागणी करीत आहेत. मात्र आजही शहरातील पूर्व-पश्चिम वाहतूक एकमेव उड्डाणपुलावरून सुरू आहे. या उड्डाणपुलावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. दरवर्षी लाखो रूपये खर्चून खड्डे बुजवले जातात. दोन ते तीन वर्षाआड या उड्डाणपुलावर विशेष खर्च केला जातो. प्रवेशद्वारावर, जुन्या कुळगाव-बदलापूर नगर परिषद मुख्यालयाशेजारी असलेल्या दुबे रुग्णालयासमोर या वर्षीही मोठा खड्डा पडला आहे. येथे मोठी वाहतूक कोंडी होत असते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या अविनाश देशमुख व महाविकास आघाडीतील इतर प्रमुख नेत्यांनी गुरुवारी खड्ड्याचा तिसरा वाढदिवस साजरा केला. या खड्ड्यात बसून कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत नगर परिषदेच्या कारभाराचा निषेध केला. उड्डाणपुलावरून जाणाऱ्या शालेय बसमधील विद्यार्थी, रिक्षाचालक, दुचाकीस्वार व कारचालकांना या वाढदिवसाचा केक भरवून प्रशासनाला उपरोधिकपणे शुभेच्छा देण्यात आल्या. वाहने हळू चालवण्याचा इशारा देणारे फलकही उड्डाणपुलावर लावण्यात आले होते.
मे व जूनमध्ये पाऊस नसताना खड्डे बुजवण्याची संधी प्रशासनाला होती, मात्र टक्केवारीच्या भांडणात प्रशासनाने नागरिकांच्या जिवाशी खेळ मांडल्याचा गंभीर आरोप अविनाश देशमुख यांनी केला. खड्ड्यांमुळे रस्त्यावर अपघात झाल्यास जबाबदार अधिकारी व प्रशासनाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला. सत्ताधारी फक्त समाजमाध्यमावर रील्स तयार करण्यात दंग असून प्रत्यक्ष रस्त्यावर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जर प्रशासनाने लवकरात लवकर निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून रस्ते सुस्थितीत केले नाहीत, तर येत्या काळात यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.
