बदलापूरः शाळांना सुरूवात होताच बदलापूर शहरातील एकमेव उड्डाणपूल पुन्हा एका कोंडीत अडकू लागला आहे. बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून या उड्डाणपुलावर कोंडी होण्यास सुरूवात झाली होती. परिणामी उड्डाणपुलाच्या दोन्ही दिशांना वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शाळेत जाणारे आणि शाळेतून सुटलेले अशा दोन्ही प्रकारचे विद्यार्थी या कोंडीत अडकले. तर रूग्णवाहिकाही या कोंडीत अडकल्या.
बदलापूर शहराच्या पूर्व पश्चिम प्रवासासाठी शहरात मध्यवर्ती भागात एकमेव उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना वाहने वळण घेताना मोठ्या प्रमाणावर कोंडी होती. काही महिन्यांपूर्वी पूर्वेतील भागात उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावर वाहनांची गर्दी विभागण्यासाठी दुभाजक बसवण्यात आले. जागेवर वळण घेणारे वाहने रोखण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरला.
मात्र जुन्या नगरपालिकेजवळ वळण घेताना वाहने खोळंबतात. परिणामी उड्डाणपुलावर वाहनांच्या रांगा लागतात. पूर्वेतून रेल्वे स्थानकाकडूनही वाहने उड्डाणपुलाकडे येतात. तेही थांबतात. अनेकदा उड्डाणपुलावरी वाहनांची रांग थेट पश्चिमेतील प्रवेशद्वारावर, दत्त चौकापर्यंत पोहोचते. बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उड्डाणपुलावर पुन्हा कोंडी झाली.
त्यामुळे पूर्वेत आदर्श शाळेच्या दोन्ही दिशेला, पश्चिमेला दत्त चौक, गणेश चौकापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या कोंडीमध्ये असंख्य वाहने अडकली. अनेक शाळा याच सुमारास सुटत असल्याने काही वेळातच शालेय वाहनांची यात भर पडली. सोबतच रूग्णवाहिकाही यात अडकल्या. परिणामी शाळेत जाणाऱ्या आणि शाळेतून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला.
भुयारी मार्ग बंद
स्थानकाशेजारचा आणि मासळी बाजारातून जाणारा भुयारी मार्ग अनेक लहान वाहनांसाठी महत्वाचा असतो. मात्र बुधवारी याच वेळी या मार्गात पाणी साचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. परिणामी अनेक रिक्षा, दुचाकीस्वारांनी उड्डाणपुलावर आपला मोर्चा वळवला. त्यामुळे कोंडीत अधिकची भर पडली.
उड्डाणपुलावरही रस्ता असमान
उड्डाणपुलावरील यंदा अजुन खड्डे पडले नसले तरी यावर टाकण्याच आलेल्या डांबरामुळे येथील भाग असमान झाला आहे. दुचाकीस्वार, रिक्षाचालकांना या भागाचा मोठा फटका बसतो. त्यामुळे हा रस्ता समान करण्याची मागणी होते आहे.
