बदलापूर : पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेला तणाव व आंतरराष्ट्रीय वाहतुकीतील हजारो अडचणींवर मात करत बदलापूरमधील चित्रशाळांमध्ये मूर्तिकारांनी घडवलेल्या गणेशमूर्ती विविध देशांमध्ये पाठविण्यात आल्या. बदलापूरमधील ‘चिंतामणी क्रिएशन’ने आजवर १ लाख ६० हजार गणेशमूर्ती जगभरातील विविध देशांमध्ये वेळेत पोहोचवल्या आहेत. त्यामुळे परदेशातील भारतीयांना गणेशोत्सव साजरा करणे शक्य होणार आहे.

परदेशातील गणेशोत्सवासाठी बदलापुरातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती पाठवल्या जातात. साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ते जूनच्या अखेरपर्यंत कंटेनरच्या माध्यमातून या मूर्तींची जगभरात रवानगी केली जाते. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका व इंग्लंड या देशांतून फेब्रुवारीमध्येच मागणीला सुरुवात होते. मात्र, यंदा पश्चिम आशियातील युद्धामुळे सागरी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात कंटेनर मिळणे अत्यंत अवघड झाले होते. त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार होती. त्यात गणेशभक्तांनी मूर्तींची मागणी नोंदवली होती. त्यामुळे यंदा परदेशात बदलापुरातील गणेशमुर्ती पोहोचतील की नाही, अशी शक्यता निर्माण झाली होती.

परदेशात गणेशमूर्ती पाठवताना प्रवासादरम्यान मूर्तींची कोणतीही विटंबना होऊ नये, यासाठी अत्यंत दर्जेदार आवरणाची आवश्यकता असते. आवरणात मूर्ती ठेवण्यासाठी लागणारे विशेष फोम हे परदेशातून देशात आयात करण्यात आले होते. युद्धामुळे या फोमचा पुरवठाही खंडित झाला. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे दरही वाढले होते. वाढलेला खर्च व महागाईचा कोणताही विचार न करता, नफ्यापेक्षा भक्तांपर्यंत गणेशमूर्ती सुरक्षितरीत्या पोहोचवणे या एकमेव उद्देशाने ‘चिंतामणी क्रिएशन’ने ही सर्व आव्हाने पेलली.

गेल्या वर्षी बदलापुरातून १ लाख ५० हजार मूर्ती परदेशात गेल्या होत्या. यंदाच्या आव्हानात्मक स्थितीत ही संख्या घटण्याऐवजी ती थेट १ लाख ६० हजारवर पोहोचली आहे, अशी माहिती ‘चिंतामणी क्रिएशन’च्या निमेश जनवाड यांनी दिली आहे. यंदा अमेरिकेत ५० हजार,कॅनडा व ऑस्ट्रेलिया प्रत्येकी २० हजार, लंडनमध्ये १५ हजार, युरोप व दक्षिण आफ्रिकेत प्रत्येकी १० हजार, दुबई, सिंगापूर व मॉरिशिअसमध्ये प्रत्येकी तीन हजार मूर्ती पाठवण्यात आल्याचे जनवाड यांनी सांगितले. युद्ध काळात वाहतुकीचे मोठे आव्हान होते. मात्र गणेश भक्तांची मागणी आणि गणेशमुर्तींची परंपरा खंडीत होणार नाही याची आम्ही काळजी घेतली, असेही जनवाड यांनी सांगितले.