Badlapur Record Rainfall 2026 : यंदाचे वर्ष एल निनोचे असताना आणि पावसाळ्याची सुरुवात गेल्या ३० वर्षांतील सर्वात कोरड्या जून महिन्याने झालेली असतानाही, बदलापूर शहराने यंदाच्या मोसमात ३ हजार मिलिमीटर पावसाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत शहरात एकूण ३ हजार ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खासगी हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी ही सविस्तर आकडेवारी आणि हवामान बदलाचे विश्लेषण केले आहे. मान्सूनचा पाऊस काळ आणि स्थळ या दोन्ही बाबतीत किती असमान असू शकतो, याचे उत्तम उदाहरण यंदा बदलापुरात पाहायला मिळाले आहे.

हंगामाच्या सुरुवातीला जून महिन्यात ५०० मिलिमीटरच्या सरासरीच्या तुलनेत केवळ ९० मिलिमीटर इतकाच पाऊस पडला होता. हा गेल्या तीन दशकांतील सर्वात नीचांकी पाऊस ठरल्याने बळीराजासह शहरवासीयही मोठ्या चिंतेत सापडले होते. मात्र, त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने अभूतपूर्व रूप धारण केले. जुलै महिन्याच्या सरासरी १ हजार ३५० मिलिमीटरच्या तुलनेत या एकाच महिन्यात तब्बल २ हजार ११८ मिलिमीटर म्हणजेच २.१ मीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये झालेल्या या अतिवृष्टीने संपूर्ण हंगामाचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले आणि जून महिन्याची प्रचंड तूट एका झटक्यात भरून काढली.

त्यानंतर ऑगस्ट महिन्यातही पावसाने आपली सरासरी बऱ्यापैकी गाठली. ऑगस्टच्या ८०० मिलिमीटर सरासरीच्या तुलनेत ६८२ मिलिमीटर पाऊस झाला, ज्याने पावसाचा जोर कायम ठेवण्यास मदत केली. सप्टेंबर महिन्यात मात्र पावसाने पुन्हा काहीशी विश्रांती घेतली असून, ४५० मिलिमीटर सरासरीच्या तुलनेत १३ सप्टेंबरपर्यंत केवळ ११९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. असे असले तरी, जुलै महिन्यातील अतिवृष्टी आणि ऑगस्ट महिन्यातील समाधानकारक कामगिरीच्या जोरावर मोसम संपण्यापूर्वीच बदलापूर शहराने ३ हजार मिलिमीटरचा पल्ला पार केला आहे. एल निनोच्या सावटाखालीही बदलापूरच्या पावसाने दाखवलेली ही कमाल उल्लेखनीय ठरली असून, हवामानातील अशा तीव्र चढ उतारांचा अभ्यास हवामान तज्ज्ञांकडून केला जात असल्याचे मोडक यांनी सांगितले आहे.