बदलापूर: ११ जून हा हवामानशास्त्रीयदृष्ट्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होण्याचा नेहमीचा काळ मानला जातो. मात्र, यंदा या परंपरेला मोठा तडा गेला असून उत्तर कोकणात मान्सूनच्या आगमनाला कमालीचा विलंब झाला आहे. खाजगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांच्या विश्लेषणानुसार, यंदा मान्सूनची उत्तरेकडील वाटचाल अत्यंत संथ गतीने सुरू असून, उत्तर कोकणात एरवी पडणारा वळीव किंवा मान्सूनपूर्व पाऊस गायब आहे. यामुळे या भागात पावसाची चर्चा बाजूला पडून तापमानाच्या नवनव्या विक्रमाची नोद होते आहे. मान्सून काळातही ठाणे जिल्हा, विशेषतः अंबरनाथ आणि बदलापूर शहरे रात्रीच्या कमालीच्या उकाड्याने आणि विक्रमी तापमानाने होरपळून निघत आहेत.
हवामान बदलाचा आणि मान्सून रेंगाळण्याचा सर्वात मोठा फटका मुंबई महानगर क्षेत्रातील अंतर्गत शहरांना बसला आहे. उत्तर कोकणाच्या अंतर्गत भागात असलेल्या बदलापूर शहरात ११ जून २०२६ रोजी रात्रीचे किमान तापमान चक्क २९.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. बदलापूरमधील गेल्या १३ वर्षांतील हे जून महिन्यातील सर्वात उष्ण रात्रीचे तापमान ठरले आहे.
यापूर्वी ११ जून २०१४ रोजी बदलापूरमध्ये २९.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती, जो आतापर्यंतचा उच्चांक होता. अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात रात्रीच्या वेळी वाहणारे वारे थंड होण्याऐवजी अत्यंत दमट आणि उष्ण राहत असल्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी वातानुकूलीत यंत्रणा आणि कुलर असूनही प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हीच स्थिती संपूर्ण ठाणे जिल्ह्यात असून बहुतांश भागात रात्रीचे तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. ज्यामुळे नागरिकांना रात्री घामांच्या धारात झोपावे लागत आहे.
केवळ अंतर्गत भागातच नव्हे, तर किनारपट्टीच्या भागातही ही स्थिती आहे. मुंबईच्या कुलाबा केंद्रावर सलग सहा दिवस रात्रीचे किमान तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.एरवी कुलाबा परिसरात अशा प्रकारच्या उष्ण रात्री ३ ते ४ दिवसांपेक्षा जास्त टिकत नाहीत. मुंबईच्या सांताक्रूझ केंद्रावरही जून महिन्यात दोन रात्री ३० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, अशीही माहिती मोडक यांनी दिली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रावरून येणाऱ्या मान्सूनच्या प्रवाहांना कोरड्या हवेच्या आक्रमणाने रोखून धरले आहे. मान्सूनपूर्व वादळी पावसाची अनुपस्थिती आणि हवेतील सागरी आर्द्रता यामुळे उत्तर कोकण आणि ठाणे जिल्हा सध्या उष्णतेच्या सापळ्याच अडकला आहे, असे निरिक्षण मोडक यांनी नोंदवले आहे. सध्याच्या हवामान परिस्थितीनुसार, जोपर्यंत अरबी समुद्रात मान्सूनचा एखादा जोरदार प्रवाह तयार होत नाही आणि तो उत्तर कोकणावरील कोरड्या हवेचा प्रभाव संपवत नाही, तोपर्यंत अंबरनाथ, बदलापूर आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्याला या तीव्र उकाड्यातून दिलासा मिळण्याची शक्यता धूसर आहे.
