बदलापूर: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बदलापूर शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. बदलापूर शहरातील एकमेव उड्डाणपूलावर दुपारी बारा वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली होती. तर पूर्व भागातून जाणाऱ्या काटई कर्जत राज्यमार्गावर कार्मेल शाळेसमोर मोठ्या प्रमाणावर वाहने अडकून पडली. शाळेच्या बस भर रस्त्यात उभ्या करण्यात आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. त्याचा काटई कर्जत राज्यमार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा फटका बसला. विशेष म्हणजे एरवी वाहनांची तपासणी करणारे वाहतूक पोलीस गायब होते.

राज्यातील बहुतांश शाळा गेल्या आठवड्यात सुरू झाल्या असल्या तरी अनेक वर्ग सोमवारपासून सुरू झाले. दोन वर्षानंतर नियमित शाळा सुरू झाल्याने शाळेच्या बसचा व्यवसायही सुरू झाला. मात्र बदलापूर शहरात या शाळेच्या बसमुळे काटई कर्जत राज्य मार्ग बंद पडला होता. बदलापूर पूर्व येथून जाणाऱ्या या राज्यमार्गावर कार्मेल शाळा आहे. या शाळेच्या बस सोमवारी दुपारच्या सुमारास बदलापूर वरून काटईकडे जाणाऱ्या या मार्गावर उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे रस्त्याचा दोन तृतीयांश भाग व्यापला गेला होता. पाल्यांना सोडण्यासाठी आलेल्या पालकांनी रस्त्यावरच मोठ्या संख्येने वाहने उभी केली होती . तसेच रस्त्याच्या कडेलाच रिक्षा उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे येथून जाणाऱ्या इतर वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. या वाहनामुळे या चौकात मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली होती. वाहनांची रांग कार्मेल शाळेपासून थेट जुन्या कात्रज पेट्रोल पंप पर्यंत पोहोचली होती. त्याचा परिणाम कर्जतकडे जाणाऱ्या मार्गीकेवर झाला. एरवी या मार्गावर कार्मेल शाळेजवळ वाहतूक पोलिसांची तपासणीसाठी मोठी गर्दी असते. मात्र सोमवारी एकही वाहतूक पोलीस या ठिकाणी उपलब्ध नव्हता. त्यामुळे वाहन चालकच आपापल्यापरीने वाहतूक कोंडी सोडवत होते.

दुसरीकडे शहरातील एकमेव उड्डाणपूलही कोंडीत अडकला होता. दुपारी बारा वाजल्यापासून उड्डाणपुलावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पश्चिमेला वाहनांची रांग थेट दत्त चौकापर्यंत तर पूर्व भाग वाहनांची ही रांग आदर्श शाळेपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे वाहने मोठा काळ खोळंबून राहिली. भुयारी मार्ग सुरळीत नसल्याने उड्डाणपूलावर कोंडी वाढली आहे.